धामना येथील महामार्ग पुलाखाली विवाहित युवकाचा रात्री सर्पदंशाच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ!
– पोळ्याचा सण तायडे-वानखडे परिवारासाठी ठरला दुःखदायक!
वाडी: पोळ्याचा सण सर्वासाठी उत्साह व नातेवाईक यांची भेट घडवून आणतो,मात्र अमरावती महामार्गावरील वाडी व धामना येथील तायडे-वानखडे कुटुंबियांसाठी दुःख व आक्रोश घेऊन आला,परिवारातील विवाहित युवक अल्पेश भाऊराव तायडे वय २९ वर्ष याचा तान्ह्या पोळ्याच्या दिवशी सर्पदंशाने निधन झाल्याची घटना घडली.
प्राप्त माहिती नुसार वाडी येथील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार विजय वानखडे यांचे सासरे कडील मंडळी अमरावती महामार्गावरील धामना या गावात राहतात. कुटुंबप्रमुख भाऊराव तायडे हे हायवे वरील एका हॉटेल मध्ये काम करतात. तर घरी पत्नी,विवाहित मुलगा मृतक अल्पेश पत्नी–व 2 वर्षाच्या मुलीसह राहतात.मृतक अल्पेश मिळेल ते मजुरीचे काम करून कुटुंबाला हातभार लावतो.
शुक्रवारी बैल पोळ्या ला रात्री च्या सुमारास धामना गावच्या हायव्ये खालील पुलाखालून तो जात असताना येथे अंधारात जलसंचय असलेल्या भागात त्याला सर्पदंश झाला.या मुळे त्याने घाबरून या सापाला पकडण्याचा प्रयत्न केला. रागाच्या भरात अल्पेश ने या सापाला पकडले व दगडाने ठेचून ठार केले. हा साप विषारी आहे की बिनविषारी आहे हे दुर्लक्षित करून फेरफटका मारून एका तासानंतर गावातील नातेवाईक यांचेकडे जाऊन घटना सांगितली.
या नातेवाईकांने मात्र ही बाब गंभिरतेने घेत त्याला घेऊन त्याच्या घरी नेले व त्याच्या आईला ही घटना सांगितली.या दरम्यान मात्र अल्पेश ला चक्कर येऊ लागल्याने सर्व घाबरले.त्वरित गावातील इतर परिचिताना सूचना दिली १०८ रुग्णवाहिकेला फोन केल्यास अधिक उशीर होईल ही बाब लक्षयात घेता दुचाकीवरच त्याला बसून रात्री १ च्या सुमारास नागपुरातील मेडिकल ला त्याला उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत्यू झाल्याचे सांगितले.रात्री २ वाजता ही दुःखद घटना वानखेडे व तायडे सह परिवारात समजताच आक्रोश व दुःख निर्माण झाले.
शनिवारी सकाळी उत्तरीय तपासणी नंतर त्याचा मृतदेह वाडी येथे आणण्यात आला तेंव्हा वातावरण शोकमय झाले,व पोळ्याच्या आनंदाच्या दिनीच या कुटुंबियांवर कोसळलेल्या या दुःखाबद्दल हळहळ व्यक्त करण्यात आली.दुपारी वाडी टेकडी येथे त्यांचे वर अंत्यसंस्कार करण्यात आले.
तर धामना परिसरात ज्या ठिकाणी ही दुर्घटना झाली त्या पुलाखाली पावसाळ्यात जलसंचय असतो,व लाईटची पुरेशी सोय नसल्याने नागरिक सतत दहशतीखाली असतात,हायवे प्राधिकरण व ग्राम पंचायत ने तातडीने उपाय योजना करणे गरजेचे असल्याचे मत धामना येथील नागरिकांनी व्यक्त केले
या प्रसंगी या घटनेची माहिती मिळताच वाडी परिसरातील सर्पमित्र शशांक गजभिये व मेश्राम यांनी भेट देऊन घटना समजून घेतली.सर्पदंश झालेल्या व्यक्तीला २ तासाच्या आत योग्य उपचार व समुपदेशन व मानसिक आधार मिळाल्यास वाचविणे श्यक्य असल्याचे सांगून पावसाळ्यात सर्पदंश प्रमाणात वाढ दिसते,सतर्क व योग्य कार्यवाही करणे गर्जेचे असल्याचे सांगितले.