Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Fri, Aug 17th, 2018

  श्रद्धेय अटलजींचे योगदान देशवासियांच्या कायम स्मरणात राहील – अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार

  मुंबई: माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी सहस्रकातील एक रत्न होते. त्यांचे योगदान देशवासियांच्या कायम स्मरणात राहील. संवेदनशील, कविमनाचे असलेल्या अटलजींनी देशहितासाठी प्रसंगी वज्राहून कठोर निर्णय घेतले. त्यांच्या देशभक्तीची भावना कायम मनात राहील, अशा शब्दांत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अटलबिहारी वाजपेयी यांना आदरांजली अर्पण केली.

  भारताचे माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर आज राज्य शासनाच्या वतीने मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी लोकप्रतिनिधी, विविध देशांचे वाणिज्यदूत, वरिष्ठ शासकीय अधिकारी, तिन्ही सैन्यदलाचे वरिष्ठ अधिकारी तसेच नागरिकांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

  श्री. मुनगंटीवार म्हणाले, भारतमातेच्या भूमीवर या सहस्रकात ज्या नररत्नांनी जन्म घेतला, त्यापैकी अटलजी एक होते. ते संत मनाचे, संवेदनशील हृदयाचे, देशासाठी प्रसंगी कणखर भूमिका घेणारे, कविमनाचे, हिमालयापेक्षा उत्तुंग कर्तृत्व असलेले, अजातशत्रू व्यक्तिमत्व होते. देशासाठी सर्वांना एकत्र करुन देशाच्या सर्वांगीण विकासाचा विचार त्यांनी केला. देशाच्या प्रगतीचा ध्यास अखंड बाळगला. देशाच्या विकासात त्यांचे खूप मोठे योगदान आहे.

  ‘भारत जमीन का टुकडा नही, जीता जागता राष्ट्रपुरुष है’ असे श्रद्धेय अटलजी नेहमी म्हणायचे. त्यांचे विचार देशावर प्रेम करणाऱ्या भारतमातेच्या सुपुत्रांसाठी प्रेरणादायी ठरतील, असे सांगून श्री. मुनगंटीवार यांनी अटलजींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

  उपस्थित मान्यवरांनी अटलजींच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली. यावेळी परिवहनमंत्री दिवाकर रावते, गृह राज्यमंत्री दीपक केसरकर, गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर, खासदार अरविंद सावंत, आमदार अबू असीम आझमी, मंगलप्रभात लोढा, पराग अळवणी, मनिषा चौधरी, निरंजन डावखरे, अमीन पटेल, लोकायुक्त न्या. एम. एल. तहलियानी, मुख्य सचिव डी. के. जैन, पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर, विविध देशांचे मुंबईतील वाणिज्यदूत, तिन्ही सैन्यदलाचे वरिष्ठ अधिकारी, वरिष्ठ सनदी अधिकारी, पोलीस अधिकारी, शिक्षण, सामाजिक आदी क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145