Published On : Mon, May 29th, 2017

दानागंज येथील शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधकामाचा आयुक्तांनी घेतला आढावा


नागपूर
: नागपूर महानगरपालिकेद्वारे तयार करण्यात आलेल्या दानागंज येथील शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधकामाचा आढावा महानगरपालिकेचे आयुक्त अश्विन मुदगल यांनी घेतला. यावेळी प्रामुख्याने अतिरिक्त आयुक्त डॉ. रामनाथ सोनवणे, नगररचना विभागाच्या सहायक संचालक सुप्रिया थूल उपस्थित होते.

शॉपिंग कॉम्प्लेक्स तयार करताना तेथे असलेले अतिक्रमण त्वरित हटवून ती जागा आपल्या ताब्यात घ्यावी व त्याजागेसाठी तयार केलेला आराखडा पुन्हा सुधारीत करून एफएसआय गणना करण्यासाठी सादर करण्यात यावा असे आदेश आयुक्त अश्विन मुदगल यांनी संबंधित अधिका-यांना दिले. संबंधित शॉपिंग कॉम्प्लेक्स पश्चिमेला डीपी रोड प्रस्तावित आहे. हा रस्ता तयार करण्यासाठी लागणारे ना-हरकत प्रमाणपत्रासाठी रेल्वे प्रशासनाला संबंधित झोनमार्फत अर्ज सादर करावा, त्याचप्रमाणे रस्त्याच्या आड येणा-या गुरूद्वारा बांधकामासाठीसुद्धा ना-हरकत प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर करावा असेही आदेश आयुक्तांनी दिलेत.

या सर्व बांधकामासाठी लागणारा अवधी वाढविण्याची मागणी अधिका-यांनी केली असता जोपर्यंत प्रीमियम मनपाला देणार असेल तरच बांधकामाची मुदतवाढ वर्षभरासाठी वाढवून दिली जाईल असे आश्वासन आयुक्तांनी यावेळी अधिका-यांना दिले. या सर्व प्रक्रिया एका महिन्याच्या आत पूर्ण कराव्या असे आदेश आयुक्त अश्विन मुदगल यांनी अधिका-यांना दिले.

या बैठकीत भांडेवाडी येथील सांडपाणी पुनर्चक्रीकरण व पुनर्वापर प्रकल्पाचा आढावा आयुक्त अश्विन मुदगल यांनी घेतला.

बैठकीला लकडगंज झोनचे सहायक आय़ुक्त सुभाष जयदेव, कार्यकारी अभियंता (स्लम) डी.डी. जांभूळकर, अधीक्षक अभियंता दिलीप जामगडे, अनिरूद्ध चौंगजकर, स्थावर अधिकारी भुते, विश्वराज इंफ्रास्कट्चरचे अधिकारी उपस्थित होते.