Published On : Tue, Jul 17th, 2018

मंगळवारी सकाळी मुख्यमंत्री ठोस घोषणा करणार

Nagpur: बोंडअळी, मावा आणि तुडतुड्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने डिसेंबर 2017 मधील घोषणेप्रमाणे मदत न दिल्याच्या निषेधार्थ विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी रात्री सभागृहातच ठिय्या आंदोलन सुरू केले होते.

सरकार आपल्या घोषणेप्रमाणे संपूर्ण मदत नेमकी केव्हा देणार, याची ठाम घोषणा झाल्याशिवाय आपण सभागृहाबाहेर पडणार नाही, असा इशारा विखे पाटील यांनी दिला होता. त्यानुसार सोमवारी रात्री उशिरा 12.15 च्या आसपास विधानसभेचे कामकाज संपल्यानंतर विखे पाटील यांच्यासह काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुमारे डझनभर आमदारांनी सभागृहातच ठिय्या मांडला.

दरम्यानच्या काळात संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट आणि गृहराज्य मंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सातत्याने विरोधी पक्षांची मनधरणी केली. परंतु, सरकार जोवर ठाम घोषणा करत नाही, तोवर सभागृहाबाहेर न पडण्याची भूमिका विरोधी पक्षांनी घेतली होती.

त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विखे पाटील यांच्याशी संपर्क साधला. बोंडअळी, मावा, तुडतुडाची मदत देण्यात विलंब झाल्याचे मान्य करून यासंदर्भात मंगळवारी सकाळी 11 वाजता कामकाज सुरू होताच विधानसभेत निवेदन करण्याचे आश्वासन दिले. त्याचप्रमाणे मदतवाटपामध्ये दिरंगाईसाठी कारणीभूत असलेल्यांवर कारवाई करण्याचाही शब्द त्यांनी दिला.

राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतःच निवेदन करण्याची भूमिका घेतल्याने त्यांच्या पदाचा मान ठेवून आपण आपले आंदोलन आजपुरते स्थगित केले असून, मंगळवारी सकाळी सरकारने ठोस घोषणा न केल्यास हेच ठिय्या आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे.