मुंबई : राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. नुकताच शिंदे-फडणवीस सरकारसोबत अजित पवार यांनी हातमिळवणी केली. २ जुलै २०२३ या दिवशी अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांच्यासह नऊ जणांचा शपथविधी पार पडला. मात्र शिंदे-फडणवीस सरकारला एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला तरी दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार अद्यापही झालेला नाही.
अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंड केल्यानंतर त्यांना शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद देण्यात आले आहे. यातच आता मंत्रिमंडळाच्या विस्तारासंदर्भात एकनाथ शिंदे यांनी मोठे विधान केले. मंत्रिमंडळाचा विस्तार एक आठवड्यात होईल असे शिंदे म्हणाले.
कुणाला कुठलं मंत्रिपद मिळणार? एकनाथ शिंदे गटाला किती मंत्रिपदं आणि खाती मिळणार? भाजपा आमदारांना काय मिळणार हे सगळं पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. जे काही इच्छुक आमदार आहेत त्यांच्यापैकी कुणीही नाराज नाही, असे शिंदे म्हणाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाप्रमाणे काँग्रेस फुटणार का? असे विचारले असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की आता जागा फुल झाल्या आहेत.असे काहीही होणार नाही. अजित पवार आमच्यासह आल्याने आपल्या सरकारची ताकद वाढली आहे. अजित पवार यांनी विकासाला साथ दिली आहे. आम्ही जी भूमिका घेतली आहे बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची त्याच भूमिकेने आम्ही पुढे चाललो असल्याचे शिंदे म्हणाले.