
नागपूर : भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो) विद्यार्थी आघाडीच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील विविध शैक्षणिक व प्रशासकीय समस्यांकडे सिनेट सदस्यांचे लक्ष वेधण्यात आले. विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या अडचणींबाबत निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
भाजयुमो विद्यार्थी आघाडीचे संपर्क प्रमुख शंतनु झाडे यांच्या नेतृत्वात हे निवेदन देण्यात आले. या उपक्रमाला भाजयुमो नागपूर शहर अध्यक्ष सचिन करारे तसेच भाजप नागपूर शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांचे मार्गदर्शन लाभल्याची माहिती देण्यात आली.
निवेदनात विद्यापीठातील अनेक गंभीर प्रश्न मांडण्यात आले. सध्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे निकाल दीर्घकाळ प्रलंबित राहत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. तसेच प्रवेश प्रक्रिया आणि परीक्षा व्यवस्थापनात पारदर्शकतेचा अभाव असल्याचेही विद्यार्थ्यांनी निदर्शनास आणून दिले. विद्यार्थ्यांच्या तक्रारींना वेळेवर प्रतिसाद मिळत नसल्यामुळे समस्या अधिकच वाढत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले.
याशिवाय पीएचडी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेली आरआरसी (Research and Recognition Committee) प्रक्रिया अनेक ठिकाणी प्रलंबित असल्याची बाबही समोर आणण्यात आली. आरआरसीच्या बैठका वेळेवर न झाल्यामुळे संशोधक विद्यार्थ्यांच्या संशोधन कार्यात विलंब होत असून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर त्याचा परिणाम होत असल्याचे सांगण्यात आले.
भाजयुमो विद्यार्थी आघाडीने विद्यापीठ प्रशासनाकडे काही महत्त्वाच्या मागण्या देखील मांडल्या आहेत. त्यामध्ये सर्व प्रलंबित परीक्षांचे निकाल तात्काळ जाहीर करणे, प्रवेश व परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी प्रभावी डिजिटल प्रणाली विकसित करणे, विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे त्वरित निराकरण करण्यासाठी स्वतंत्र विद्यार्थी तक्रार निवारण कक्ष स्थापन करणे तसेच पीएचडी विद्यार्थ्यांच्या प्रलंबित आरआरसी बैठका तातडीने आयोजित करण्याची मागणी करण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी या सर्व प्रश्नांवर तातडीने सकारात्मक निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी भाजयुमो विद्यार्थी आघाडीच्या वतीने करण्यात आली.
यावेळी शंतनु झाडे, यश गौर, लिखित गणवीर, आशू गुंगावकर, चंदन वर्मा, प्राची नेरकर आणि प्रणव चवनडके आदी उपस्थित होते.








