Published On : Mon, May 29th, 2017

शेतक-यांकडून पाय धुवून घेताना भाजप नेत्यांना लाज कशी वाटली नाही ? : सचिन सावंत

  • नितीन गडकरींचे वक्तव्य शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळणारे
  • भाजपने राज्यातील शेतक-यांची माफी मागावी

Sachin Sawant
मुंबई:
शेतक-यांकडून पाय धुवून घेताना भाजप नेत्यांना लाज कशी वाटली नाही? असा संतप्त सवाल करित भाजपने आपल्या पदाधिकारी, आमदार आणि खासदारांच्या या कृत्याबद्दल राज्यातील शेतक-यांची माफी मागावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

भाजपच्या शिवार संवाद यात्रेत भाजपचे पदाधिकारी आणि आमदार, खासदार यांनी अकोला जिल्ह्यात शेतक-यांकडून पाय धुवून घेतले. या घटनेचा निषेध करून सावंत म्हणाले की, शेतक-यांकडून पाय धुवून घेताना भाजप नेत्यांना लाज कशी वाटली नाही? राज्यात रोज शेतकरी मरत आहेत भाजप सरकारच्या काळात राज्यातील साडेनऊ हजारांपेक्षा जास्त शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. राज्यातील शेतक-यांची हजारो टन तूर पडून आहे. मंत्रालयात शेतक-यांना मारहाण केली जात आहे. तूर खरेदी करण्याची मागणी करणा-या शेतक-यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष शिव्या देत आहेत. शेतक-यांना दिलासा देण्याऐवजी संवाद साधण्याच्या नावाखाली भाजप नेते शेतक-यांकडून पाय धुवून घेत आहेत. भाजप नेत्यांना थोडीजरी लाज वाटत असेल तर त्यांनी या कृत्याबद्दल राज्यातील शेतक-यांची माफी मागावी असे सावंत म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, “कर्जमाफी दिल्याने शेतक-यांचे प्रश्न सुटत नाहीत. विरोधी पक्ष नेहमीच कर्जमाफीची मागणी करत असतात आम्हीही विरोधात असताना करायचो.” असे वक्तव्य करून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे.

भाजपने कायमच शेतक-यांची प्रतारणा केली आहे. उद्योगपतींना हजारो कोटींची कर्जमाफी देणा-या भाजप सरकारची शेतक-यांना कर्जमाफी देण्याची दानत नाही, हेच गडकरी यांच्या वक्तव्यावरून दिसते आहे. काँग्रेस सरकारने देशातील सर्व शेतक-यांचे कर्ज माफ करून शेतक-यांना दिलासा दिला होता आणि या कर्जमाफीमुळे शेतकरी आत्महत्यांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली होती. परंतु गेल्या चार वर्षाच्या सततच्या दुष्काळ आणि नापिकी आणि शेतीमालाच्या पडलेल्या भावामुळे शेतकरी पुन्हा कर्जबाजारी झाला आहे. अशा परिस्थितीत शेतकरी जगवण्यासाठी त्याला कर्जमाफी दिल्याशिवाय पर्याय नाही. देशातील उद्योगपतींना हजारो कोटींची कर्जमाफी देणा-या पंतप्रधान मोदींना कर्जमाफीमुळे प्रश्न सुटत नाहीत हा फुटकचा सल्ला का दिला नाही? असा सवाल सावंत यांनी केला.