
नागपूर,: नागपूर शहरातील नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहावे, त्यांना शुद्ध पेयजल मिळावे यासाठी ‘ऑरेंज सिटी वॉटर’ (ओसीडब्ल्यू) ने एक विशेष जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. अनधिकृत पाणी वापराकडून कायदेशीर महानगरपालिका नळ जोडणीकडे वळलेल्या नागरिकांचा अनुभव या मोहिमेद्वारे लोकांपर्यंत पोहोचवला जात आहे.
शहरातील काही भागात नागरिक अनवधानाने किंवा माहितीच्या अभावामुळे अनधिकृत नळ जोडणीचा वापर करत होते. काही ठिकाणी जुन्या आणि नवीन अशा दोन्ही पाईपलाईनमधून पाणी घेतले जात होते. मात्र, बिल केवळ एकाच जोडणीचे भरले जात होते. अशा अनधिकृत वापरामुळे दूषित पाण्याचा आणि त्यातून होणाऱ्या आजारांचा मोठा धोका होता. तसेच, अधिकृत ग्राहक नसल्यामुळे अशा नागरिकांना महानगरपालिकेच्या अनेक सुविधांपासून वंचित राहावे लागत होते. ज्या नागरिकांनी पुढाकार घेऊन आपल्या नळ जोडणीचे नियमितीकरण केले आहे, त्यांना आता खालील फायदे मिळत आहेत:
– शुद्ध व प्रक्रिया केलेले पाणी: उच्च गुणवत्तेचे आणि पिण्यायोग्य पाण्याचा खात्रीशीर पुरवठा.
– तत्पर तक्रार निवारण: तक्रारींचे जलद आणि प्रभावी निराकरण.
– नियमित अपडेट्स: पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक, दुरुस्ती किंवा शटडाऊनबाबत मोबाईलवर नियमित अलर्ट.
– मोफत टँकर सेवा: दूषित पाणीची तक्रार असल्यास अधिकृत ग्राहकांना मोफत टँकर पुरवला जातो.
– २४/७ मदत केंद्र: कोणत्याही मदतीसाठी २४ तास सुरू असलेल्या कॉल सेंटरची सुविधा.
नागपूरकरांचे अनुभव:
कायदेशीर नळ जोडणी घेतल्यावर जीवन कसे सुसह्य झाले, याबाबत विविध झोनमधील नागरिकांनी आपले अनुभव मांडले आहेत
सतरंजीपुरा झोन अंतर्गत येणारे श्री जॉर्जी पन्ना सांगतात,”या भागात पूर्वी पाण्याचे खूप प्रश्न होते, पण आता ते पूर्णपणे सुटले आहेत. तर नेहरूनगर झोन निवासी श्रीमती शाहीन हुसेन यांनी नवीन पाईपलाईन टाकल्यापासून पाणीपुरवठा अतिशय उत्तम होत असेल्याचे सांगितले.
आशीनगर झोन रहिवासी श्रीमती स्वाती प्रवीण लांजेवार यांनी सांगितले की,आम्हाला सांडपाणी मिश्रित पाणी येत होते, आम्ही ओसीडब्ल्यू कडे तक्रार केली आणि आता नवीन पाईपलाईन टाकून नळ सुरू झाले आहेत. तर धंतोली झोन रहिवासी श्री.संकेत मानपिया यांनी आमची पाईपलाईन नुकतीच शिफ्ट करण्यात आली आहे, त्यामुळे आता पाणी चांगले येत आहे. बिल सुद्धा वापराप्रमाणेच येत असल्याचे सांगितले.
गांधीबाग झोन रहिवासी श्रीमती सीमाताई रोहणकर पूर्वी पाण्याची मोठी समस्या होती, पण आता व्यवस्थित पाणीपुरवठा होत आहे. सतरंजीपुरा झोन रहिवासी श्री. राजाराम पराते म्हणाले की, आता दिवसातून दोनदा पाणी येते, ते स्वच्छ असते आणि मीटरप्रमाणे येणाऱ्या बिलावर मी समाधानी आहे.
नागरिकांनी जबाबदार नागरिक म्हणून कायदेशीर नळ जोडणीचाच वापर करावा, असे आवाहन ओसीडब्ल्यूने केले आहे. यामुळे केवळ वैयक्तिक लाभच मिळत नाहीत, तर शहराच्या आरोग्य व्यवस्थेलाही बळकटी मिळते.
पाणी पुरवठ्याबाबत अधिक माहिती किंवा मदतीसाठी ग्राहक NMC-OCW हेल्पलाईन क्रमांक १८००२६६९८९९ वर संपर्क साधू शकतात किंवा contact@ocwindia.com या ईमेलवर आपली शंका पाठवू शकतात.








