Published On : Tue, Sep 29th, 2020

कोरोना रुग्णांसाठी बेड्सची उपलब्धता वाढली

Advertisement

महापौर संदीप जोशी आणि आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या प्रयत्नांना यश

नागपूर: जोखिमीची लक्षणे असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांना रुग्णालयांमध्ये बेड्स उपलब्ध व्हावे यासाठी महापौर श्री.संदीप जोशी आणि आयुक्त राधाकृष्ण बी. यांच्या मार्फत करण्यात आलेल्या प्रयत्नांना यश येत असल्याचे दिसून येत आहे. नागपूर महानगरपालिकेच्या प्रयत्नाने आता खाजगी ‍आणि शासकीय रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांकरिता खाटांची उपलब्धता केली जात आहे. मंगळवारी (ता.२९) खाजगी रुग्णालयांमध्ये ५८० तसेच शासकीय रुग्णालयांमध्ये २४० बेड्स उपलब्ध झाल्याचे दिसून आले. कोव्हिड -१९ च्या रुग्णांना यापासून मोठा दिलासा मिळाला आहे.

माननीय उच्च न्यायालयच्या नागपूर खंडपीठाने महापौर श्री. संदीप जोशी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली होती. या समितीमध्ये विभागीय आयुक्त, मनपा आयुक्त, आय.एम.ए.चे अध्यक्ष, खाजगी रुग्णालयाचे प्रतिनिधी यांचा समावेश होता. या समितीच्या माध्यमाने खाजगी रुग्णालयांची सुनावणी घेण्यात आली आणि त्यांनी सुद्धा प्रशासनाला सहकार्य करीत आपली तयारी दर्शविली. त्याचे फलित म्हणून कोरोनाच्या गंभीर रुग्णांसाठी बेड्स उपलब्ध होत आहे.

मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात दररोज ५००० च्या वर नागरिकांची चाचणी केली जात आहे. चाचणीसाठी ५० चाचणी केंद्र सुरु केले आहेत. तसेच १० मोबाईल सेंटरच्या माध्यमातून चाचणी सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून हायरिक्स कान्टॅक्ट, रेड लिस्ट कान्टॅक्ट तसेच घरी राहणा-या ज्येष्ठ नागरिक ज्यांना मधुमेह, बी.पी. सारखे आजार आहे. त्यांची चाचणी केली जात आहे. मनपा आयुक्तांनी पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना आपली चाचणी करुन घेण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले की, जर कुणाच्याही घरी किंवा इमारतीमध्ये किंवा राहत असलेल्या माळ्यावर पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यास त्यांचा संपर्कात आलेल्या नागरिकांनी आपली नि:शुल्क कोव्हिड-१९ चाचणी करुन घेतली पाहिजे. चाचणी करण्यास कोणी टाळाटाळ करीत असेल तर मनपाला कडक भूमिका घ्यावी लागेल.

मनपा आयुक्तांनी सांगितले की, कोरोना बाधित रुग्णांचा डबलिंग रेट २१ दिवसांवरुन वाढून आता ३८ दिवस झाला आहे. मृतकांची संख्या तसेच कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सुद्धा कमी होत चालली आहे. मनपातर्फे कान्टॅक्ट ट्रेसिंग सुद्धा केली जात आहे. आता एका कोरोना बाधिताच्या जवळच्या संपर्कातील १० जणांचे कान्टॅक्ट ट्रेसिंग होत आहे. लवकरच ते २० लोकांपर्यंत करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.