नागपूर : सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रतेच्या सुनावणीसंदर्भात आज पुन्हा एकदा खडेबोल सुनावले आहे. गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना तातडीने सुनावणीबाबत वेळापत्रक सादर करण्याचे निर्देश दिले होते. मात्र मात्र, विधानसभा अध्यक्षांनी आजही सुधारित वेळापत्रक सादर न केल्यामुळे न्यायालयानं परखड शब्दांत विधानसभा अध्यक्षांवर ताशेरे ओढले. तसेच, विधानसभा अध्यक्षांसमोरील सुनावणी ही सविस्तर नसते तर समरी स्वरूपाची असते, असे मत न्यायालयाने स्पष्ट केले.
राहुल नार्वेकरांची बाजू मांडताना सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी वेळापत्रक सादर करण्यासाठी अतिरिक्त वेळेची मागणी केली. यावेळी न्यायालयाने संताप व्यक्त केला.
आम्हाला याचीही खात्री करावी लागेल की यासंदर्भात योग्य वेळेत आदेश दिले जातील. विधानसभा अध्यक्षांसमोरची सुनावणी ही खरंतर समरी प्रक्रिया आहे. ही सुनावणी काही निवडणूक आयोगासमोरच्या सुनावणीसारखी सविस्तर नाही जिथे पुरावे सादर करावे लागतील आणि अध्यक्षांना हे ठरवावं लागेल की कोणत्या पक्षाकडे कोणतं चिन्ह आहे. अध्यक्षांकडून केली जाणारी चौकशी ही मर्यादित चौकशी असते, असेही न्यायालयाने यावेळी म्हटले.
दरम्यान, यावेळी न्यायालयाने ३० ऑक्टोबरला पुढील सुनावणी ठेवली असून दरम्यानच्या काळात सॉलिसिटर जनरल तुषार मेहतांनी विधानसभा अध्यक्षांसोबत बसून वेळापत्रक ठरवावं, असे आदेश दिले. त्यामुळे या प्रकरणाची पुढची सुनावणी ३० ऑक्टोबर रोजी होईल, असे न्यायालयाने म्हटले आहे.