Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Sat, Jul 21st, 2018

  विदर्भातील कलावंतांची ख्याती जगभर व्हावी : महापौर

  नागपूर : विदर्भ ही कलावंतांची खाण आहे. येथील कलावंतांना योग्य आणि हक्काचे व्यासपीठ मिळत नसल्यामुळे त्यांची कीर्ति दूरवर जात नाही. विदर्भातील टॅलेन्ट विदर्भातच दबले जाते. ‘व्हाईस ऑफ विदर्भ’ या स्पर्धेच्या माध्यमातून अशाच कलावंतांना व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न आहे. या माध्यमातून पुढे येणाऱ्या कलावंतांची ख्याती जगभर व्हावी हीच नागपूर महानगरपालिकेची प्रामाणिक भूमिका असल्याचे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी केले.

  नागपूर महानगरपालिका व लकी इव्हेन्ट्स ॲण्ड म्युझिकल एंटरटेनमेन्ट यांच्या संयुक्त विद्यमाने एक्सेल इव्हेंटस्‌ सोल्यूशन्स ॲन्ड सर्विसेस यांच्या सहकार्याने कविवर्य सुरेश भट यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विदर्भातील प्रतिभावंत गायक कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित ‘व्हाईस ऑफ विदर्भ’ स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला शनिवारी (ता. २१) अमृत भवन येथे सुरुवात झाली. प्राथमिक फेरीच्या उद्‌घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.

  मंचावर नागपूर महानगरपालिकेचे क्रीडा सभापती नागेश सहारे, ज्येष्ठ कलावंत योगेश ठक्कर, पं. जयंत इंदूरकर, सुनील वाघमारे, सारंग जोशी, प्रदीप गोंडाणे, मनिषा देशकर, हर्षल हिवरखेडकर यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, आजचे युग हे रिॲलिटी शो चे युग आहे. विदर्भातील प्रत्येक कलावंत त्या शोमध्ये पोहचू शकत नाही.

  अशा कलावंतांना आपल्या शहरात हक्काचे व्यासपीठ देऊन मुंबईपर्यंत पोहचविणे असा या स्पर्धा आयोजनामागचा हेतू आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून विदर्भाला उदयोन्मुख गायक कलावंत मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

  तत्पूर्वी दीपप्रज्वलन करून ‘व्हाईस ऑफ विदर्भ’च्या प्राथमिक फेरीचे विधीवत उद्‌घाटन महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर योगेश ठक्कर, पं. जयंत इंदूरकर आदी ज्येष्ठ कलावंतांचा सत्कार करण्यात आला. स्पर्धेचे संचालन लकी म्युझिकल ग्रुपचे संचालक लकी खान यांनी केले.

  आजही रंगणार प्राथमिक फेरी
  २२ जुलै रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळात प्राथमिक फेरी रंगणार आहे. शनिवारी (ता. २१) विदर्भातील सर्वच जिल्ह्यातून प्राथमिक फेरीला कलावंतांनी उपस्थिती लावली. दोन फेऱ्यांमध्ये कलावंतांनी आपल्या गायकीने परिक्षकांना मंत्रमुग्ध केले. १४ वर्षाखालील आणि १४ वर्षावरील अशा दोन गटात ही स्पर्धा होत आहे. स्पर्धेच्या अंतिम फेरीत विजेत्या ठरणाऱ्या कलावंतांना २१,००० रुपये प्रथम, ११,००० रुपये द्वितीय व ७००० रुपये तृतीय असे रोख बक्षीस प्रदान करण्यात येणार आहे.

  ४ ऑगस्टला महाअंतिम फेरी
  कविवर्य सुरेश भट यांच्या स्मृतिनिमित्त आयोजित ‘व्हाईस ऑफ विदर्भ’ची महाअंतिम फेरी ४ ऑगस्ट रोजी रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात होणार आहे. प्राथमिक फेरीतून ३० उत्कृष्ट स्पर्धक अंतिम फेरीत सादरीकरण करतील. स्पर्धेच्या माध्यमातून जमा होणारी रक्कम मानव सुधार प्रयास संस्थेला सोपविण्यात येणार आहे.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145