Published On : Fri, Dec 22nd, 2017

कस्तुरचंद पार्कच्या पहिल्या टप्प्यातील सौंदर्यीकरणाला हेरिटेज समितीची मंजुरी

Heritage Com

नागपूर: कस्तुरचंद पार्कच्या पहिल्या टप्प्यातील सौंदर्यीकरणाचा संपूर्ण आराखडा तयार झाला असून नागपूर हेरिटेज संवर्धन समितीच्या बैठकीत वास्तुविशारद आणि समिती सदस्य अशोक मोखा यांनी सादर केला. या आराखड्याला समितीने मंजुरी दिली. तर जीपीओ इमारत परिसरात सुरू असलेल्या बांधकामावर समितीने आक्षेप घेतला असून बांधकाम थांबविण्यासाठी नोटीस बजावण्याचे निर्देश देण्यात आले.

निरीचे माजी संचालक आणि समितीचे सदस्य डॉ. तपन चक्रवर्ती यांच्याअध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला समितीचे सदस्य वास्तुविशारद अशोक मोखा, मनपाचे उपायुक्त राजेश मोहिते, नासुप्रचे अधीक्षक अभियंता सुनील गुज्जलवार, स्ट्रक्चरल इंजिनिअर पी. एस. पाटणकर, नागपूर विद्यापीठाच्या प्रपाठक डॉ. शुभा जोहरी, वास्तुविशारद हबीब खान, नीता लांबे, नगररचना सहायक संचालक सुप्रिया थूल, नगररचनाकार प्र.प्र. सोनारे उपस्थित होते.

सदर बैठकीत कस्तुरचंद पार्कच्या पहिल्या टप्प्यातील सौंदर्यीकरणाचा आराखड्याचे वाचन समितीचे सदस्य अशोक मोखा यांनी केले. याअंतर्गत होणाऱ्या सौंदर्यीकरणामध्ये अंतर्भूत असलेल्या बाबींची माहिती त्यांनी दिली. या आराखड्याला समितीच्या सदस्यांनी सर्वानुमते मंजुरी दिली.


जीपीओ इमारत परिसरात सुरू असलेल्या बांधकामाची बाब समितीच्या लक्षात आल्यानंतर त्यावर समितीने तीव्र आक्षेप घेतला. हेरिटेज संवर्धन समितीची कुठलीही परवानगी न घेता बांधकाम सुरू असल्यामुळे तातडीने संबंधित प्रशासनाला नोटीस बजावण्याचे निर्देश बैठकीचे अध्यक्ष श्री. तपन चक्रवर्ती यांनी दिले.

समितीपुढे मंजुरीसाठी १७ प्रकरणे आलीत. संबंधित अधिकारी आणि प्रतिनिधींनी त्यासंदर्भात माहिती दिली. सोनेगाव तलाव सौंदर्यीकरणासंदर्भातील प्रस्ताव समितीपुढे आला. या प्रकरणामध्ये महानगरपालिकेतर्फे विकास योजना आराखड्यामध्ये कलम ३७ खालील फेरबदलाचा प्रस्ताव प्रस्तावित असल्याने त्याअनुषंगाने हरकती/सूचना मागविण्यात आल्या आहेत. त्यानंतर तो प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या मंजुरीनंतर तलावाचे क्षेत्रफळ कमी न करता, कुठलेही प्रदूषण होणार नाही याची काळजी घेत राज्य शासनाच्या अटी व शर्तींना अधीन राहून सौंदर्यीकरण करण्यास हरकत नसल्याचे समितीने सूचित केले.

दोन विविध संस्थांतर्फे प्रस्तावित मॅरॉथॉन, नाताळनिमित्त ईसाई समाजातर्फे काढण्यात येणारी बाईक रॅली, मनपातर्फे घेण्यात येणाऱ्या महापौर चषक राष्ट्रीय सायकल पोलो स्पर्धेकरिता अटी व शर्तींच्या अधीन राहून समितीने मंजुरी दिली. प्रदर्शनीच्या प्रस्तावांवर मात्र असहमती दर्शविली. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या इमारतीमध्ये ज्येष्ठ व दिव्यांगांना सोयीचे व्हावे यासाठी सदर इमारतीमध्ये उद्‌वाहन बसविण्याचा प्रस्तावही हेरिटेज समितीसमोर ठेवण्यात आला. या प्रस्तावाला समितीने मंजुरी प्रदान केली.

नागपूर हेरिटेज संवर्धन समितीचे अध्यक्ष भा.प्र.सेवेतील निवृत्त अधिकारी अरुण पाटणकर यांचे २५ नोव्हेंबर रोजी निधन झाले. सभेच्या प्रारंभी त्यांना समिती सदस्याननी श्रद्धांजली अर्पण केली.