Published On : Mon, Jan 1st, 2018

कर थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई करा

नागपूर : वारंवार डिमांड पाठवूनही जर कोणी कर भरत नसेल तर आता महानगरपालिकेचे अधिकार वापरा. वारंट बजावून तातडीने जप्तीची कारवाई करा आणि १०० टक्के करवसुलीचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून कार्य करा, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले.

हनुमान नगर झोन कार्यालयात कर वसुलीसंदर्भात आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. महापौर नंदा जिचकार यांनी बोलाविलेल्या बैठकीत उपमहापौर दीपराज पार्डीकर, झोन सभापती भगवान मेंढे, सहायक आयुक्त (कर) मिलिंद मेश्राम, हनुमाननगर झोनचे सहायक आयुक्त राजू भिवगडे, नगरसेविका उषा पायलट, स्वाती आखतकर, लिला हाथीबेड, मंगला खेकरे, विद्या मडावी, श्रीमती ठाकरे, कल्पना कुंभलकर, उपस्थित होते.

महापौर नंदा जिचकार यांनी यावेळी सर्व कर निरिक्षकांच्या आतापर्यंतच्या कामगिरीचा आढावा घेतला. ज्या कर निरीक्षकाने त्यांच्याकडे असलेल्या उद्दिष्टापेक्षा कमी वसुली केली असेल तर त्याची कारणे काय, याबाबत विचारणा केली. पुढील सात दिवसांत वसुलीचे आणि जप्तीचे उद्दिष्ट त्यांच्यासमोर ठेवण्यात आले. सात दिवसानंतर पुन्हा बैठक घेण्यात येईल. त्यावेळी जर समाधानकारक वसुली आणि जप्ती झालेली नसेल तर प्रशासनाला संबंधित कर्मचाऱ्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.