Published On : Tue, May 10th, 2022

‘ती’ कारवाई म्हणजे महाविकास आघाडी सरकारची मोघलशाही

Advertisement

– आ. चंद्रशेखर बावनकुळेंनी केला अमरावती पोलिसांचा निषेध

अमरावती : शहरातील भाजपा कार्यालयावर शिवसैनिकांनी केलेल्या हल्ल्याचा निषेध नोंदविण्याऱ्या भाजपा पदाधिकाऱ्यांवरच अमरावती पोलिसांनी गुन्हे नोंदविले. ही कारवाई मोघलशाही असल्याचे राज्याचे माजी मंत्री आ. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात अमरावती येथील भाजपा कार्यालयावर शिवसैनिकांनी हल्ला करून जाळपोळ केली होती. त्यानंतर घटनेचे पडसाद शहरात उमटले. राजापेठ पोलिसांनी हल्ला करणाऱ्या शिवसैनिकांवर ठोस कारवाई करावी अशी मागणी करणाऱ्या भाजपा पदाधिकाऱ्यांवरच गुन्हे दाखल केले आहेत. आज सोमवारी अमरावती सत्र न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी होती. दरम्यान आज आ. चंद्रशेखर बावनकुळे अमरावतीत आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

आ. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार राज्यात मोघलशाहीने वागत आहे. भाजपा कार्यालयावर हल्ला करणारे शिवसैनिक अद्यापही मोकाट फिरत आहेत. त्यांच्यावर तुटपुंज्या कारवाईचा देखावा अमरावती पोलिसांनी उभारला अन् घटनेचा निषेध नोंदविणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांवर मात्र गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले.

आज संपूर्ण राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अशाच मोघलशाही पद्धतीने वागत आहे. परंतु आम्ही शांत बसणार नाही. ही मोघलशाही मोडीत निघत नाही तोपर्यंत संघर्ष सुरू राहणार असल्याचे आ. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

यावेळी अमरावती ग्रामीण भाजपा जिल्हाध्यक्ष निवेदिता चोधरी, अमरावती भाजपा शहराध्यक्ष किरण पातुरकर, तुषार भारतीय, प्रणीत सोनी, सागर महल्ले, भूषण हरकोट, सुरज जोशी, तुषार चौधरी, प्रवीण रुद्राकार, शुभम वैष्णव, अंकित जैन, संगम गुप्ता, अशोक शाहू, प्रवीण कौंडिण्य आणि अमोल थोरात प्रामुख्याने उपस्थित होते.