नागपूर: विदर्भातील रणरणत्या उन्हात शासकीय वसतिगृहातील विद्यार्थिनींना मोठा दिलासा देणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन, नागपूरच्या विद्यार्थिनींनी आज त्यांचे प्रत्यक्ष आभार मानले. “आमची समस्या एका मोठ्या भावाच्या मायेने समजून घेतली,” अशा भावूक शब्दांत विद्यार्थिनींनी आपल्या भावना व्यक्त करत मुख्यमंत्र्यांना ‘धन्यवाद देवाभाऊ’ असे पत्रक सोपवले.बेसा, नागपूर येथील १ हजार मुलींच्या शासकीय वसतिगृहातील विद्यार्थिनींना कडक उन्हामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.
वसतिगृहाच्या जुन्या नियमांनुसार कुलर लावण्यासंदर्भात कोणतीही तरतूद नसल्याने, प्रशासकीय स्तरावर वारंवार मागणी करूनही अधिकारी कुलर लावण्यास नकार देत होते. विदर्भातील वाढत्या तापमानामुळे अनेक मुलींना उष्णतेमुळे त्वचेचे आजार (इन्फेक्शन) झाले होते, तर परीक्षेच्या काळात अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे कठीण झाले होते. ही गंभीर समस्या भाजप शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांच्या मार्गदर्शनात आणि नगरसेवक रितेश गावंडे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री कार्यालयाकडे पोहोचवण्यात आली होती.निवेदनातील गांभीर्य ओळखून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ मुख्यमंत्री कार्यालयातील सचिव आणि समाज कल्याण विभागाला कारवाईचे आदेश दिले.
विदर्भातील उन्हाची तीव्रता लक्षात घेता, त्यांनी जुन्या जाचक नियमावलीत शिथिलता आणून नागपूरमधील वसतिगृहांसाठी ६०० कुलर आणि संपूर्ण विदर्भातील वसतिगृहात कुलरची व्यवस्था करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे भारावलेल्या आकांक्षा उके, सानिया देवगडे, माई बनसोड, श्रावणी सुतार, तृप्ती नंदेश्वर व इतर विद्यार्थिनींनी भाजप युवती प्रमुख प्रशंसा भोयर यांच्या सोबत प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे ऋण व्यक्त केले.
“आमचा एक-एक दिवस मरणासन्न अवस्थेत जात होता, मात्र मुख्यमंत्र्यांनी आमच्या विनंतीची दखल घेऊन तत्काळ निर्णय घेतला, यामुळे आम्हाला मोठा आधार मिळाला आहे. परीक्षेच्या काळात आपण दिलेली ही ‘कुलरची सावली’ आम्हाला अधिक जोमाने अभ्यास करण्यास नक्कीच मदत करेल,” असे पत्रक विद्यार्थिनींनी मुख्यमंत्र्यांना दिले. प्रशासकीय दिरंगाई बाजूला सारून एका संवेदनशील लोकनेत्याने घेतलेल्या या ‘सुपरफास्ट’ निर्णयाचे संपूर्ण नागपुरात स्वागत होत आहे.









