Published On : Fri, Mar 19th, 2021

ठाकरे यांनी केली दुर्गानगर कोरोना चाचणी केन्द्राची पाहणी

नागपूर : नागपूर महानगरपालिकेचे सत्तापक्ष नेता श्री. अविनाश ठाकरे यांनी हनुमाननगर झोन येथील दुर्गानगर माध्यमिक शाळे मध्ये सुरु असलेल्या कोरोना चाचणी केन्द्राला शुक्रवारी भेट दिली. या केन्द्रावर शुक्रवारपासून कोरोनाची चाचणी करण्यात येत आहे.

महापौर श्री.दयाशंकर तिवारी यांना सूचना मिळाली होती की नागरिक चाचणीसाठी जमले आहे पण चाचणी सुरु झालेली नाही. तसेच शाळेत मुलेसुध्दा स्कॉलरशीपसाठी येत आहे. महापौरांनी श्री.ठाकरे यांना या केन्द्राला भेट देवून तपासणी करण्याची सूचना केली होती. याची दखल घेत श्री. ठाकरे यांनी माजी झोन सभापती श्रीमती रुपाली ठाकरे यांचा समवेत दुर्गानगर शाळेत सुरु झालेल्या चाचणी केन्द्राची पाहणी केली.

त्यांनी झोनचा सहाय्यक आयुक्त सुषमा मांडगे आणि झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ.बकुल पांडे सोबत संवाद साधून चाचणी केन्द्रावर उत्तम व्यवस्था करणे तसेच नागरिकांसाठी पिण्याचे पाणी व शौचालयाची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. त्यांनी सांगितले की आतापर्यंत चाचणी झोन कार्यालयाचा परिसरात होत होती सध्या रुग्ण वाढल्यामुळे इथे शुक्रवारपासून सुरु करण्यात आली आहे.

पहिला दिवस असल्यामुळे काही अडचणी झाल्या. यानंतर संपूर्ण खबरदारी घेण्याचे ही निर्देश त्यांनी दिले. तसेच दुर्गानगर शाळेत येणा-या विद्यार्थ्यांसाठी सुध्दा वेगळी व्यवस्था करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यावेळी श्री.मनोज जोशीसुध्दा उपस्थित होते.