Published On : Fri, Mar 19th, 2021

ऑनलाईन नोंदणी करणा-यांसाठी लसीकरण केंद्रावर वेगळी रांग

महापौर दयाशंकर तिवारी यांचे निर्देश : स्थायी समिती सभापतींनी केली ईएसआयएस केंद्राची पाहणी

नागपूर: शहरात सुरू असलेल्या सर्व लसीकरण केंद्रांवर ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने नोंदणी करणा-यांना लस दिली जात आहे. मात्र यामध्ये आधीच ऑनलाईन नोंदणी करून आलेल्यांना पुन्हा प्रतीक्षेत राहावे लागत असल्याचे दिसून येते. त्यामुळे लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी करणा-यांना प्राथमिकता देण्यात यावी यासाठी ऑफलाईन आणि ऑनलाईन नोंदणी करणा-यांची लसीकरण केंद्रावर वेगळी रांग असावी, असे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले आहेत.

कोव्हिड लसीकरण केंद्रावर ऑफलाईन नोंदणीसाठी गर्दी होत असल्याची तक्रार प्राप्त होताच महापौर दयाशंकर तिवारी यांच्या सूचनेवरून स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर यांनी शुक्रवारी (ता.१९) महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी रुग्णालय (ईएसआयएस) येथील लसीकरण केंद्राला भेट देउन पाहणी केली.

ईएसआयएस लसीकरण केंद्रावर ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणी करणा-या लाभार्थ्यांची लस घेण्यासाठी एकच रांग असल्याने सोशल डिस्टंसिंगचे व्यवस्थितीत पालन होत नसल्याचेही दिसून आले. अशीच समस्या इतरही लसीकरण केंद्रांवर असल्याने ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणी करणा-यांसाठी वेगळी रांग करण्याचे निर्देश महापौरांनी दिले आहेत. ऑनलाईन नोंदणी करणा-यांना लसीकरणासाठी प्राथमिकता देण्यात यावी, असेही त्यांनी नमूद केले. लसीकरण केंद्रावर गर्दी होउ नये व सुरळीतरित्या लसीकरण कार्यक्रम पार पाडावा, यासाठी महापौरांनी सूचना केली आहे.


शहरातील सर्वांनाच टप्प्याटप्प्याने लस दिली जावी यासाठी आरोग्य विभागाद्वारे प्रयत्न सुरू आहेत. सध्या शहरात ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षावरील गंभीर आजार असलेल्या रुग्णांचे लसीकरण सुरू आहे. लसीकरणासाठी लाभार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने घरी बसूनच अगदी सोप्या पद्धतीने नोंदणी करता येते. याशिवाय ज्यांना ऑनलाईन नोंदणी शक्य नाही, त्यांच्यासाठी ऑफलाईन पद्धतीने नोंदणीही सुरू आहे. ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने नोंदणी करणा-यांना लसीकरणासाठी निर्धारित वेळेचे टोकन देण्यात येते त्या वेळेवरच संबंधित व्यक्तीला लस दिली जाते. या प्रणालीमुळे लसीकरण केंद्रावर गर्दी होत नाही. मात्र ऑफलाईन नोंदणी करणारे व्यक्ती वेळेवर नोंदणीसाठी येत असल्याने प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण होतो. त्यामुळे नागरिकांनी शक्यतो ऑनलाईन पद्धतीनेच नोंदणी करावी तसेच ऑफलाईन मध्ये ५० लोकांचे लसीकरण करण्यात यावे, असे आवाहन स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर यांनी केले आहे. महापौरांच्या निर्देशावर प्रकाश भोयर यांनी तिथे पाहणी केली. त्यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

लसीकरणासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी ऑनलाईन पद्धतीनेच नोंदणी करावी, यासाठी प्रत्येक केंद्रावर ऑफलाईन नोंदणी करणा-या लाभार्थ्यांच्या तुलनेत ऑनलाईन नोंदणी करणा-यांना प्राधान्याने लस दिली जावी अशी सूचनाही त्यांनी केली. त्यांच्या समवेत नेहरुनगर झोन सभापती श्रीमती स्नेहल बिहारे सुध्दा होत्या.