मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. विशेषतः मुंबई महापालिका निवडणुकीसंदर्भात एक महत्त्वाची चर्चा रंगू लागली आहे. ठाकरे बंधू म्हणजेच शिवसेनेचे (ठाकरे गट) उद्धव ठाकरे आणि मनसेचे राज ठाकरे एकत्र येणार का? या चर्चांवर खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे.
माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, “महाविकास आघाडी अजूनही सक्रिय आहे. या आघाडीतून कोणीही बाहेर गेलेले नाही. आगामी निर्णयही एकत्रच घेतले जातील.” त्यांनी स्पष्ट केलं की इंडिया आघाडी ही संसदीय निवडणुकांसाठी असली, तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वेगळी रणनीती आखावी लागते.
मुंबई महापालिकेतील निवडणुकीबाबत विचारले असता, राऊत म्हणाले, “उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र निवडणूक लढावी, अशी लोकांची इच्छा आहे. पाच जुलै रोजी याच गोष्टीचं प्रतिबिंब दिसलं. त्यामुळे या मुद्यावर भविष्यात चर्चा नक्कीच होईल. मात्र, त्यासाठी आतापासून चिंता करण्याची गरज नाही.”
राऊत यांच्या या वक्तव्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना अधिक उधाण आले असून, आगामी महापालिका निवडणुकीपूर्वी मुंबईच्या राजकारणात मोठे परिवर्तन पाहायला मिळण्याची शक्यता आहे.