मुंबई : 2008 च्या मालेगाव स्फोट प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA) विशेष न्यायालयाने निकाल देत साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, ले. कर्नल श्रीकांत पुरोहित यांच्यासह सातही आरोपींना निर्दोष मुक्त केल्यानंतर राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या निकालानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या अधिकृत एक्स हँडलवरून प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की,आतंकवाद भगवा कधीच नव्हता आणि कधीच होणार नाही.
विशेष एनआयए न्यायालयाचे न्यायाधीश ए. के. लाहोटी यांनी निकाल देताना तपास प्रक्रियेतील अनेक त्रुटींवर बोट ठेवले. न्यायालयाने नमूद केले की, या प्रकरणात सादर करण्यात आलेले पुरावे ठोस, विश्वासार्ह व निर्णायक नाहीत, त्यामुळे आरोपींना शंका लाभ देत बरी करण्यात येत आहे. याचसोबत, या स्फोटात बळी गेलेल्या सहा पीडितांच्या कुटुंबांना प्रत्येकी दोन लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये इतकं नुकसानभरपाई देण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले.
या निकालावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे. भाजपा व इतर हिंदुत्ववादी संघटनांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. तर शिवसेना (उद्धव ठाकरे गट), काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, तपास यंत्रणांच्या निष्काळजीपणावर टीका केली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या प्रतिक्रियेला राजकीयदृष्ट्या मोठं महत्त्व आहे. त्यांच्या वक्तव्यातून भाजपचा स्पष्ट संदेश आहे की हिंदुत्व किंवा भगव्या विचारधारेचा आतंकवादाशी काहीही संबंध नाही. सध्या राज्यात आणि देशात या निकालावरून नव्या राजकीय चर्चेला सुरुवात झाली आहे.