Published On : Fri, Nov 6th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूरच्या बैद्यनाथ चौकात भरधाव ट्रॅव्हल्सचा थरार; पादचाऱ्याला चाकाखाली चिरडले, जागीच मृत्यू

Advertisement


नागपूर : शहरातील रस्त्यांवरील बेदरकार वाहनचालकांमुळे अपघातांचे सत्र सुरूच असून, बैद्यनाथ चौकात गुरुवारी रात्री भीषण अपघात घडला. भरधाव खाजगी ट्रॅव्हल्स बसने रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला जोरदार धडक देत चाकाखाली चिरडले. या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या पादचाऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमली असून, वाहनचालकाच्या निष्काळजीपणाबद्दल संताप व्यक्त करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री सुमारे १०.४० वाजताच्या सुमारास खुराना ट्रॅव्हल्सची बस (एमएच ४० सीटी ८०३८) बैद्यनाथ चौकातून इमामवाड्याच्या दिशेने वळत होती. याचवेळी एक पादचारी रस्ता ओलांडत असताना बसच्या धडकेत खाली पडला आणि बसच्या पुढील चाकाखाली आल्याने त्याचा मृत्यू झाला. वळणावर वाहनाचा वेग कमी करणे अपेक्षित असतानाही चालकाने निष्काळजीपणे बस पुढे नेल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला आहे.

घटनेनंतर घटनास्थळी नागरिकांनी एकच गर्दी केली. काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेडिकल रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. दरम्यान, मृत पादचाऱ्याची ओळख अद्याप पटलेली नाही. बसचालकाचे नावही पोलिसांकडून अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेले नव्हते. या भीषण अपघाताचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.