
नागपूर : जिल्ह्यातील कामठी परिसरात रविवारी सकाळी गॅस सिलेंडरच्या भीषण स्फोटामुळे मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत एका तरुणाचा गुदमरून मृत्यू झाला असून सुमारे १० जण जखमी झाले आहेत. घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गांधीनगर भाजी मंडई परिसरात अतुल उर्फ बंटी पानतावणे हे आपल्या कुटुंबासह राहत होते. रविवारी सकाळी त्यांच्या पत्नी स्वयंपाकघरात चहा बनवण्यासाठी गेल्या असता गॅस गळतीमुळे प्रथम आग लागली आणि त्यानंतर अचानक सिलेंडरचा जोरदार स्फोट झाला.
स्फोटानंतर काही क्षणांतच आगीने संपूर्ण घराला वेढा घातला. कुटुंबातील इतर सदस्यांनी प्रसंगावधान राखत बाहेर पडण्यात यश मिळवले, मात्र अतुल पानतावणे हे बेडरूममध्ये अडकून पडले आणि गुदमरल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.
आग विझवण्याच्या प्रयत्नात त्यांच्या नातेवाईकांसह शेजारीही जखमी झाले. जखमींमध्ये विनय पानतावणे, नितीन पानतावणे आणि संध्या ढवळे यांच्यासह इतरांचा समावेश असून सर्वांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र तोपर्यंत घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले होते. या आगीत सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, पोलिसांनी घटनेची नोंद घेत तपास सुरू केला आहे. तसेच स्थानिक नागरिकांनी पीडित कुटुंबाला शासनाकडून आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे.








