
नागपूर : शहरात गुन्हे शाखेच्या युनिट ३ ने ‘ऑपरेशन थंडर’ अंतर्गत मोठी कारवाई करत जरीपटका पोलीस ठाणे हद्दीत गांजा तस्करीच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी ८५ किलो गांजासह सुमारे ४८ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई उशिरा रात्री निर्मल कॉलनी, जरीपटका परिसरात करण्यात आली. गुप्त माहितीच्या आधारे पोलिस पथकाने छापा टाकत दोन आरोपींना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची ओळख फिरोज खान सरदार खान (रा. मानकापूर) आणि मोहम्मद शकील मोहम्मद भूरू (रा. यशोधरानगर) अशी झाली आहे. तर या प्रकरणातील तिसरा आरोपी हरपितसिंग उर्फ ‘हॅप्पी’ फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी केलेल्या घरझडतीत ८५ किलो गांजा, तीन मोबाईल फोन, एक वजन काटा तसेच तीन चारचाकी वाहने जप्त करण्यात आली. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे ४८ लाख ७० हजार रुपये असल्याचा अंदाज आहे.
या प्रकरणी एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपासासाठी आरोपींना जरीपटका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.








