नागपूर (उमरेड): नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील विरळी परिसरात रविवारी एक हृदयद्रावक अपघात घडला. वेगात आलेल्या ओमनी कारने नऊ वर्षीय बालकाला जोरदार धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या बालकाचा मृत्यू झाला असून, कार चालक अपघातानंतर घटनास्थळावरून फरार झाला आहे.
मृत बालकाचे नाव शिवम अण्णाजी आत्राम (वय ९) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवम आपल्या घरासमोर रस्त्यालगत खेळत असताना अचानक एक भरधाव ओमनी कार आली आणि त्याला जोरात धडक दिली. या धडकेत शिवम गंभीर जखमी झाला.
अपघातानंतर परिसरातील लोकांनी त्वरीत त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला तपासल्यानंतर मृत घोषित केले.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या अज्ञात ओमनी कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू करण्यात आला आहे.या दुर्दैवी घटनेमुळे विरळी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.