नागपूर : तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी राष्ट्र समिती या पक्षाच्या विस्तारासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. यापार्श्वभूमीवर ते लवकरच नागपूरमध्ये पक्षाचे कार्यालय उघडतील अशी माहिती समोर आली आहे. या कार्यालयाचे उद्घाटन राव यांच्या हस्ते केले जाईल.
राव यांच्या भारत राष्ट्र समितीने आगामी महापालिकेच्या निवडणुकीसाठी मैदानात उतरण्याची तयारी सुरु केली आहे. राव यांचा शनिवारी पक्षाच्या स्थापनादिवस आहे. या अनुषंगाने त्यांनी नागपूरमध्ये पक्ष कार्यालय उघडण्याचा निर्णय घेतला. इतकेच नाही पक्षवाढीसाठी त्यांनी पक्षप्रवेशाचा धडाकाही सुरु केला.
सोमवारी इंदोरा परिसरात पक्षाचे समन्वयक प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांच्या उपस्थितीत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.संघटनेचा विस्तार आणि निवडणुकीत सहभाग होण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली आहे. तुमसरचे माजी आमदार चरण वाघमारे यांच्या नेतृत्वात विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा बीआरएसमध्ये प्रवेश केला जात आहे. शिवसेना शिंदे गटाचे माजी विधानसभा संगठक प्रवीण शिंदे काही दिवसांपूर्वी राव यांच्या बीआरएसमध्ये प्रवेश केला.
तेलंगणाच्या हैदराबाद हाऊसमध्ये मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी शिंदे यांचे पक्षात स्वागत केले. गौरव जैन, रुपेश ठाकरे, प्रमोद कावळे, शैलेंद्र फुलझेले, अमित बावने, रितेश सायरे, प्रजोत सातकर, सूर्यकांत थूल, चंदन राजभर, निखिल शेंडे, कमलेश साखरे, संजय हाडे, आदित्य तायडे यांनी सुदाह बीआरएसचा झेंडा हाती घेतला आहे.