
नागपूर : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी नागपूरातील प्रसिद्ध श्री गणेश टेकडी मंदिरात भक्तिमय वातावरणात भव्य महाआरतीचे आयोजन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भाविक उपस्थित होते.
महाआरतीपूर्वी श्री गणेशाला १००१ दुर्वांचा विशेष हार अर्पण करण्यात आला. तसेच उद्धव ठाकरे यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभावे आणि महाराष्ट्र राज्यात सुख, शांती व समृद्धी नांदावी, अशी प्रार्थना करण्यात आली. मंदिर परिसरात धार्मिक आणि उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळाले.
यावेळी सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांसाठी विविध उपक्रमही राबविण्यात आले. भाविक आणि नागरिकांना १००१ रामरक्षा स्तोत्र पुस्तिकांचे मोफत वाटप करण्यात आले. तसेच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर गरजू नागरिकांना छत्र्यांचे वितरण करून समाजोपयोगी संदेश देण्यात आला.
या प्रसंगी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विकास आणि जनहिताचे कार्य अधिक बळकट व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमानंतर उपस्थितांनी श्री गणेशाचे दर्शन घेत महाप्रसादाचा लाभ घेतला. संपूर्ण कार्यक्रम भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात पार पडला.




