Published On : Wed, Mar 28th, 2018

मेट्रोच्या फिडर सर्व्हिसेसला टॅक्सी आणि ऑटो रिक्षाचालकांचे समर्थन

Advertisement

नागपूर: महा मेट्रो नागपूर प्रकल्पासंबंधी एकीकडे सर्व सामान्य नागपूरकरांना मोठ्या प्रमाणात उत्साह आणि अपेक्षा असतानाच दुसरीकडे शहर वाहतुकीचा महत्वाचा भाग असलेल्या टॅक्सी आणि ऑटो रिक्षा चालकांना देखील मेट्रो प्रकल्पा बद्दल कमालीची उत्सुकता आहे. नागपुरात होऊ घातलेल्या मेट्रो प्रकल्पामुळे ओला, उबेर आणि ऑटो रिक्षाचालकांना भविष्यात आर्थिक नुकसान सहन करावे लागेल अशी शंका त्यांच्या मनात होती. मात्र असे काही होणार नसून या उलट ओला, उबेर आणि ऑटो रिक्षाचालकांना भविष्यात प्रवासी सेवेसाठी व्यवसाय करता ज्यास्त संधी उपलब्ध होणार आहे.

मेट्रो स्टेशनच्या पार्किंग परिसरात ओला, उबेर आणि ऑटो रिक्षाचालकांना सुद्धा जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तेव्हा मेट्रोतून प्रवास करणाऱ्या नागरिकांना त्यांच्या कार्यस्थळी आणि घरपर्यंत पोहोचविण्याचे कार्य या ओला, उबेर आणि ऑटो रिक्षाचालकांना करता येणार आहे. उल्लेखनीय म्हणजे फिडर सर्व्हिसेसच्या माध्यमाने नागपूर मेट्रोला टॅक्सी आणि ऑटो रिक्षा व शेयरिंग सायकल यांना एका महाकार्ड वर जोडण्याचा प्रयत्न महा मेट्रो नागपूर तर्फे करण्यात येत आहे. यासंबंधित याआधी अनेकवेळा मेट्रो फिडर सर्व्हिसेसची माहिती सर्व नागरिकांना देण्यात आली आहे. नागरिकांनी नागपूर मेट्रोच्या फिडर सर्व्हिसेस बद्दल उत्सुकता दर्शविली आहे.

शहराच्या एकूणच वाहतूक व्यवस्थेत दुचाकी आणि चारचाकी खाजगी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात आहेत. हे खाजगी वाहन वापरणाऱ्या नागरिकांनी मेट्रोतुन प्रवास करावा असा प्रयत्न नागपूर मेट्रो करीत आहे. त्यामुळे ओला, उबेर आणि ऑटो रिक्षाचालकांना मेट्रो पासून कोणतेही आर्थिक नुकसान सहन करावे लागणार नाही. उलट खाजगी वाहन वापरणारे नागरिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा उपयोग करायला लागल्यास त्याचा फायदा मेट्रोसह बस, ओला,उबेर आणि ऑटो रिक्षाचालकांना होईल. आधीपर्याय नसल्याने खाजगी वाहनाने घरून ऑफिस किंवा इतर आपल्या कार्यस्थळी जाणारे नागरिक वातानुकूलित मेट्रोतून प्रवास करण्यासाठी नजीकच्या मेट्रो स्टेशन पर्यंत पोहोचण्यास ओला, उबेर आणि ऑटोरिक्षाचा वापर करेल. नागपूर मेट्रो प्रकल्पा विषयी शहरातील ओला, उबेर आणि ऑटो रिक्षाचालकांशी प्रत्यक्ष संवाद साधला असता त्यांनीही आपल्या काही मागण्यांसह नागपूर मेट्रो प्रकल्पाचे स्वागत केले आहे. विदर्भ ऑटो.रिक्षा चालक फेडरेशनश्चे अध्यक्ष विलास भालेराव यांनी ऑटो रिक्षाचालकांसाठी मेट्रोच्या प्रत्येक स्टेशन वर पार्किंगस्थळी ऑटो चालकांसाठी ऑटो स्टॅन्डशी व्यवस्था करावी.

प्रशासनातर्फे ऑटो चालकांसाठी वेगळे अँप तयार करण्यात यावे. फिडर सर्व्हिसेस संदर्भात ऑटो चालकांशी चर्चा व्हावी अश्या मागण्या केल्या तर मीटर प्रमाणे ऑटो ची सेवा सुरु राहण्यासाठी प्रशासनाने जनजागृती करावी व वाहतुकीच्या नियमांचे उल्लन्घन करणाऱ्या ऑटो चालकांवर कठोर कारवाईची मागणी टायगर ऑटो रिक्षा संघटनेचे अध्यक्ष जावेद शेख यांनी केली.

तसेच ऑनलाइन टॅक्सी सेवा देणाऱ्यांपैकी रमेश पाटील यांनी सुद्धा मेट्रो स्थानकावर ओला, उबेर साठी पार्किंग ची व्यवस्था करून देण्याची मागणी केली आहेण् या शिवाय मेट्रो मार्गाशी संलग्न असणाऱ्या मार्गावर आणि इतर दुसऱ्या मार्गावर ओला, उबेर चालकांना व्यवसाय करता यावा आणि मेट्रोच्या फिडर सर्व्हिसेसच्या माध्यमाने ओला, उबेर यांचाही प्रचार प्रसार करण्यात यावा अशी मागणी टॅक्सी चालविणाऱ्या सचिन साखरकर यांनी केली आहे. ओला उबेर आणि ऑटो रिक्षाचालकांच्या या मागणीवर तोडगा काढण्याचे प्रयत्न नागपूर मेट्रो तर्फे होणार आहे. भविष्यात फिडर सर्व्हिसेस च्या माध्यमाने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करून खाजगी वाहनांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न महामेट्रो तर्फे केल्या जात आहे. जेणेकरून वायू आणि ध्वनी प्रदूषणावर आळा घालून पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत होईल.