ठाणे : ज्येष्ठ तमाशा कलावंत तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ तमाशा कलावंत मधुकर नेराळे यांना मागील वर्षीच्या पुरस्कारप्राप्त तमाशा कलावंत राधाबाई खोडे-नाशिककर यांच्या हस्ते वाशी येथील कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांची उपस्थिती होती. सिडको प्रदर्शन केंद्रात हा कार्यक्रम पार पडला. रु. ५ लाख, मानचिन्ह, मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर तमाशा ढोलकी फड महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.तमाशा रसिकांनी याचा आनंद घेतला.
सांस्कृतिक कार्यमंत्री मंत्री विनोद तावडे यांनी आपल्या भाषणात मधुकर पांडुरंग नेराळे यांच्याविषयी गौरवोद्गार काढले. वडिलोपार्जित तमाशा थिएटरच्या माध्यमातून वयाच्या पाचव्या वर्षापासून तमाशासोबत नेराळे यांची नाळ जोडली गेली. सुरूवातीच्या काळात पंडित राजारामजी शुक्ला यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे धडे गिरवणाऱ्या नेराळे यांनी स्वत:चे थिएटर स्थापन करून या संस्थेमार्फत लोकप्रिय वगनाट्यांचे सादरीकरण करून भूमिका केल्या, याचे कौतुक विनोद तावडे यांनी केले.
याप्रसंगी ठाणे जिल्हा परिषद अध्यक्ष मंजुषा चंद्रकांत जाधव, महापौर जयवंत सुतार, आमदार मंदा म्हात्रे यांची उपस्थिती होती.