| | Contact: 8407908145 |
  Published On : Fri, Feb 9th, 2018

  बाल कलावंतांच्या सांस्कृतिक रजनीने गाजलेला सहावा दिवस

  नागपूर: नागपूर महानगरपालिका, महिला व बालकल्याण समिती, समाज कल्याण विभाग यांच्यावतीने आयोजित महिला उद्योजिका मेळाव्याचा सहावा दिवशी बाल कलावंतांच्या सांस्कृतिक रजनीने गाजला.

  यावेळी महिला व बालकल्याण समिती सभापती वर्षा ठाकरे, स्थापत्य समिती सभापती संजय बंगाले, हनुमाननगर झोन सभापती भगवान मेंढे, नगरसेविका दिव्या धुरडे, वंदना भगत, विशाखा मोहोड, जयश्री वाडीभस्मे, नगरसेवक सुनील हिरणवार, पिंटू झलके, विजय चुटेले, उपायुक्त डॉ.रंजना लाडे प्रामुख्याने उपस्थित होते.

  चिमुकल्यांचा आगळा वेगळा बॅण्ड

  कार्यक्रमाची सुरूवात वर्धा रोडवरील टाईनी टॉट मदर्सपेट किंडरगार्टनच्या चिमुकल्यांच्या आगळ्यावेगळ्या बॅण्डने झाली. केजी वनच्या विद्यार्थ्यांनी घरगुती वापराच्या वस्तुतून संगीत निर्माण करत उपस्थितांच्या टाळ्या घेतल्या. त्यांच्या या कलेने रसिक प्रेक्षकांमध्ये जोश संचारला.

  नृत्यांची मेजवानी

  आजच्या सांस्कृतिक रजनीत चिमुकल्यांनी सादर केलेल्या क्लासिकल, हिपहॉप, राजस्थानी आदी नृत्यप्रकारांनी रंग चढविला. अपूर्वा काकडे हिने सादर केलेल्या शास्त्रीय नृत्याने रसिक मनावर मोहिनी घातली. डिंपल बैसने सादर केलेल्या हिपहॉप प्रकारातील नृत्याने रसिकांनाही थिरकायला भाग पाडले. चाहत शेख हिच्या मॉडर्न नृत्याने रसिकांचा वन्स मोअर मिळवला. लक्ष्मी गोतमारे आणि शशांक गोतमारे यांनी गायलेल्या भजनाने रसिक मंत्रमुग्ध झाले.

  स्टॉलवर नागरिकांची गर्दी वाढली.

  महिला उद्योजिका मेळाव्याच्या आजच्या सहाव्या दिवशी नागरिकांनी गर्दी केली. मेळाव्यात लागलेल्या ३०० स्टॉलवरील विविध वस्तूंची खरेदी केली. दरम्यान बिंझाणी महाविद्यालयाच्या गृह अर्थशास्त्र विभागाच्या प्रा. अंजली पाजनकर यांनी मेळाव्याला भेट दिली. दुपारच्या सत्रात दीनदयाल अंत्योदय योजना- राष्ट्रीय नागरी उपजिविका केंद्रातर्फे महिलांना विविध विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145