Published On : Mon, Dec 30th, 2019

महापौरांच्या हस्ते प्रतिभावंत कुस्तीपटू सन्मानित

Advertisement

६३व्या राज्य कुस्ती अधिवेशनासाठी शहरातील सहा पैलवांनाची निवड

नागपूर : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष गणेश कोहळे, सभासद दिलीप महाजन, नागपूर कुस्ती अकादमीचे उपाध्यक्ष दयाराम भोतमांगे यांच्यासह शहरातील प्रतिभावंत कुस्तीपटू विदर्भ केशरी निकीता लांजेवार व विदर्भ केशरी महेश काळे यांना महापौरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सोमवारी (ता.३०) महापौर कक्षामध्ये महापौर संदीप जोशी यांनी तुळशी रोपटे देउन कुस्तीपटूंना सन्मानित केले.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेवर नागपूर जिल्ह्याचे प्रतिनिधी म्हणून शहरातील गणेश कोहळे यांची उपाध्यक्ष तर दिलीप महाजन यांची सभासद म्हणून निवड करण्यात आली. तर नागपूर कुस्ती अकादमीचे उपाध्यक्षपदी दयाराम भोतमांगे यांची निवड करण्यात आली. विशेष म्हणजे नागपूर कुस्ती अकादमीचे महापौर संदीप जोशी अध्यक्ष आहेत. यासोबतच येत्या २ ते ७ जानेवारीदरम्यान बालेवाडी, पुणे येथे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे ६३वे राज्य कुस्ती अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे.

या अधिवेशनामध्ये नागपूर जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणा-या सहा प्रतिभावंत खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या खेळाडूंमध्ये महिला गटात विदर्भ केशरी निकीता लांजेवार यांच्यासह पुरूष गटात विदर्भ केशरी महेश काळे (६१ किलो वजनगट), अनिकेत हजारे (५७ किलो), हिमांशू लांजेवार (६५ किलो), चेतन घारगाटे (७४ किलो) आणि अमन तिवारी (६५ किलो) यांची निवड करण्यात आली आहे. नागपूर जिल्हा कुस्ती संघाचे प्रतिनिधीत्व करणा-या या खेळाडूंचे प्रशिक्षक म्हणून रामा येंगड, गोवर्धन वरठी, सुनील गाडगीलवार भूमिका बजावणार आहेत.

सर्व खेळाडूंचे प्रतिनिधी म्हणून महापौर संदीप जोशी यांच्या हस्ते निकीता लांजेवार व महेश काळे या दोन्ही विदर्भ केशरी कुस्तीपटूंना सन्मानित करण्यात आले. येणा-या स्पर्धेसाठी महापौरांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या तसेच राज्य कुस्तीगीर परिषदेवर आणि नागपूर कुस्ती अकादमीवर निवड झालेल्या पदाधिका-यांचे अभिनंदन केले.

याप्रसंगी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर कमिटीचे सहसचिव रमेश खाडे, सचिव बुधाजी सुलकार, आंतरराष्ट्रीय पंच तसेच माजी जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीप इटनकर, कुस्तीपटू अंशीता मनोहरे, रश्मी मनोहरे, रोहित शेंडे, भूषण भोतमांगे, सुरज खटाना, करण चव्‍हाण आदी उपस्थित होते.