Published On : Tue, Aug 28th, 2018

थकीत कर वसुली संदर्भात कडक पावले उचला – संदीप जाधव

Advertisement

नागपूर: नागपूर शहरातील नागरिकांकडे मालमत्ता कराची थकबाकी अनेक वर्षांपासून आहे. त्यामुळे मनपाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. शहरातील विविध विकास कामांना गती मिळावी, यासाठी संपूर्ण थकबाकी वसूलीसंदर्भात कडक पावले उचला, असे निर्देश मनपाच्या कर आकारणी व कर संकलन विशेष समितीचे सभापती संदीप जाधव यांनी कर निरिक्षक व कर संकलक यांना दिले.

समितीच्या वतीने कर आकारणी संदर्भातील आढावा घेण्यासाठी झोननिहाय बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी (ता. २८) आशीनगर व मंगळवारी झोनमध्ये बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. आशीनगर झोनमधील बैठकीत समितीचे उपसभापती सुनील अग्रवाल, बसपा पक्ष नेते मोहम्मद जमाल, नगरसेवक जितेंद्र घोडेस्वार, सहायक आयुक्त (कर) मिलिंद मेश्राम, आशीनगर झोनचे सहायक आयुक्त गणेश राठोड, कर अधीक्षक फा.गो उके, सहायक कर अधीक्षक गौतम पाटील तर मंगळवारी यांच्यासह झोनमधील सर्व वॉर्डाचे कर निरिक्षक व कर संकलक प्रामुख्याने उपस्थित होते.

कर विभागात मागील अनेक वर्षांपासून काम करूनही योग्य निकाल न देणाऱ्या निष्क्रीय कर निरीक्षक व कर संकलक यांच्यावर कारवाई करण्याचा इशाराही सभापती श्री. जाधव यांनी यावेळी दिला. कर निरीक्षक व कर संकलक यांचे निष्क्रीय वर्तन व बेजाबदारपणा यामुळेही दिवसेंदिवस थकबाकीचा आकडा वाढत आहे. त्यामुळेच महापालिकेकडून देण्यात आलेले त्रैमासिक उद्दिष्ट निम्मेही गाठता आले नाही. कर निरिक्षक व कर संकलक यांना येत असलेल्या अडचणी सोडविण्यास मनपा तत्पर आहे. त्यामुळे कर निरिक्षक व संकलकांनीही आपल्या कामाप्रति तत्परता दाखवावी, असेही ते म्हणाले.

कर निरीक्षक व कर संकलन यांनी आपल्या शैलीचा उपयोग करून नागरिकांशी योग्य समन्वय साधावा. आपल्या कुशल नेतृत्वगुणाचा उपयोग करून घेत ३० सप्टेंबरपर्यंत त्रैमासिक उद्दीष्टपूर्ती होईल, याकडे लक्ष्य देण्याचेही त्यांनी यावेळी निर्देशित केले. कर वसुली करताना जर त्रास होत असेल तर स्थानिक नगरसेवकांना विश्वासात घ्या, असा सल्ला समिती उपसभापती सुनील अग्रवाल यांनी दिला.