Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Tue, Apr 20th, 2021

  गरोदर मातांची घ्या विशेष काळजी कोव्हिड संवादमध्ये तज्ज्ञांचा सल्ला

  नागपूर : कोव्हिडच्या संसर्गाचा धोका सर्वत्र वाढलेला आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या तुलनेत गरोदर मातांना कोरोनाच्या संसर्गाचा धोका जास्त असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे गरोदर मातांची विशेष काळजी घ्या, असा सल्ला प्रसिद्ध प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.रागिणी मंडलिक व डॉ. सुमित बाहेती यांनी कोव्हिड संवादमध्ये दिला.

  नागपूर महानगरपालिकेचे महापौर दयाशंकर तिवारी यांच्या संकल्पनेतून नागपूर महानगरपालिका आणि इंडियन मेडिकल असोशिएनशच्या संयुक्त विद्यमाने ‘कोव्हिड संवाद’ मध्ये मंगळवारी (ता.२०) डॉ. रागिणी मंडलिक व डॉ. सुमित बाहेती यांनी ‘फेसबुक लाईव्ह’ च्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधला. ‘कोव्हिड – गरोदरपणात आणि प्रसूतीनंतर घ्यावयाची काळजी’ या विषयावर या विषयावर मार्गदर्शन केले.

  कोव्हिडमध्ये गरोदर असताना व प्रसूतीनंतर मातांनी घ्यावयाची काळजी या विषयावर बोलताना डॉ. रागिणी मंडलिक व डॉ. सुमित बाहेती यांनी नागरिकांकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे देत शंकांचे निरसरन केले. त्या म्हणाल्या, गरोदर मातांकडून बाळाला कोरोना होण्याचा धोका कमी आहे. बाळाला मातेने स्तनपान करणेही बाळाच्या आरोग्यासाठी उत्तम आहे. स्तनपान करताना आईने मास्क लावणे आवश्यक आहे. कारण कोव्हिड आईच्या दुधातून होत नसला तरी तो बोलताना तोंड आणि नाकातून पडणा-या तुषारांमुळे होउ शकतो. बाळाला स्तनपान करताना मास्क लावणे अत्यावश्यकच आहे. याशिवाय सर्व नागरिकांनीही व्यवस्थित मास्क लावणे गरजेचे आहे. तोंड आणि नाक पूर्ण झाकले जाईल, या पद्धतीनेच मास्क वापरा, असे आवाहन त्यांनी केले.

  गर्भावस्थेमध्ये महिलेची प्रतिकारशक्ती कमी होउन जाते. त्यामुळे गरोदर मातांना कोरोनाचा धोका जास्त आहे. यासाठी त्यांची विशेष काळजी घेतली जावी. मात्र काळजीपोटी त्यांच्या नियमित तपासण्या मात्र टाळू नका. दवाखान्यात जाणे शक्य नसल्यास आपल्या स्त्रीरोग तज्ज्ञांशी फोनवर संपर्क साधा किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्यांना माहिती द्या, त्यांचा सल्ला घ्या. मात्र डॉक्टरांचा नियमित सल्ला घेत रहा. प्रसूतीपूर्वी महिलेची आरटीपीसीआर चाचणी करणे आवश्यक आहे. अशावेळी अहवाल पॉझिटिव्ह आल्यास प्रसूतीदरम्यान आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जाते. गर्भावस्थेदरम्यान मातेला कुठेलेही सौम्य लक्षणे आढळल्यास तातडीने कोरोनाची चाचणी करणे आवश्यक आहे. कारण त्यामुळे बाळाला धोका निर्माण होउ शकतो. योग्य काळजी घेउन व सुरक्षेची सर्व काळजी घेउन माता आणि बाळ दोघांचीही काळजी घ्यावी, असेही डॉ. रागिणी मंडलिक व डॉ. सुमित बाहेती यांनी सांगितले.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145