Published On : Fri, Oct 23rd, 2020

अंबाझरी तलाव बळकटीकरणासंदर्भात त्वरीत कार्यवाही करा

Advertisement

महापौर संदीप जोशी यांचे निर्देश : मनपा, सिंचन विभाग व मेट्रोची बैठक

नागपूर : अंबाझरी तलाव हे नागपूर शहराचे वैभव आहे. शहराचे पुरातन वैभव जतन करून ठेवण्यासाठी त्याची योग्य देखभाल दुरूस्तीची गरज आहे. अंबाझरी ओव्हरलफ्लोची सुरक्षा भिंत जीर्ण झालेली आहे, शिवाय तलावाच्या पारीलाही भविष्यात धोका निर्माण होऊ शकतो. शहराचे वैभव जपताना नागरिकांची सुरक्षाही अत्यंत महत्वाची आहे. त्यादृष्टीने तलावाच्या बळकटीसंदर्भात आवश्यक कार्यवाही त्वरीत सुरू करा, असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी दिले.

अंबाझरी तलावाच्या सुरक्षेसंदर्भात शुक्रवारी (ता.२३) महापौर संदीप जोशी यांनी मेट्रो, सिंचन विभाग व मनपाची संयुक्त बैठक घेतली. बैठकीत उपमहापौर मनीषा कोठे, धरमपेठ झोन सभापती अमर बागडे, सत्तापक्ष उपनेत्या वर्षा ठाकरे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, प्र.उपायुक्त तथा उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, सार्वजनिक अभियंत्रिकी विभागाच्या अधीक्षक अभियंता डॉ.श्वेता बॅनर्जी, कार्यकारी अभियंता मनोज गणवीर, सिंचन विभागाचे अधीक्षक अभियंता जयंत गवई, डॉ.चांदेवार, श्री.ढुमणे, मेट्रोचे अधिकारी आणि समाजसेवक प्रवीण महाजन उपस्थित होते.

अंबाझरी तलावाची पार आणि ओव्हरफ्लोची भिंत अत्यंत जुनी असल्याने पुढील धोका रोखण्यासाठी तलावाच्या बळकटीकरणाचे कार्य लवकरात लवकर सुरू करणे आवश्यक आहे. एकूण २८ कोटी रुपये या कार्यासाठी खर्च प्रस्तावित असून नागपूर महानगरपालिका, मेट्रो आणि सिंचन विभागाच्या माध्यमातून संयुक्तरित्या हा खर्च करण्यात येणार आहे. तलावाच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ते सर्व बळकटीकरणाचे कार्य सिंचन विभागाकडून केले जाणार आहे. यासंबंधी येणारे अडथळे आणि त्रुट्या तातडीने दूर करून लवकरात लवकर काम सुरू करण्याकडे लक्ष देण्याचेही महापौर संदीप जोशी यांनी यावेळी निर्देशित केले. याशिवाय तलावाच्या परिसरातील धोकादायक ठरणारी झाडेही कापणे आवश्यक आहे. यादृष्टीनेही सर्व प्रक्रिया पूर्ण करून कार्य सुरू करण्याचे त्यांनी निर्देश दिले.

अंबाझरी तलावाजवळ मेट्रो रेल कॉर्पोरेशनने बांधकामादरम्यान उपसण्यात आलेला मलबा टाकल्याने तलावानजीकचे स्वामी विवेकानंद स्मारकाचा परिसर विद्रुप दिसत आहेत. शिवाय सदर मलबा तलावासाठी धोकादायक ठरु शकतो. हे लक्षात घेता मेट्रोने तातडीने मलबा हटविण्याचेही निर्देश महापौर संदीप जोशी यांनी दिले.