
नागपूर, दि. २० जुलै : नागपूर शहरातील दिवसेंदिवस गंभीर होत चाललेल्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर विधान परिषदेचे आमदार डॉ. परिणय फुके यांनी जिल्हा नियोजन व विकास समिती (DPDC) बैठकीत प्रभावीपणे आवाज उठविला. शहरातील प्रमुख रस्ते आणि चौकांमध्ये निर्माण होणारी वाहतूक कोंडी, नागरिकांना होणारी गैरसोय, रुग्णवाहिका व आपत्कालीन सेवांवर होणारा परिणाम, तसेच वेळ व इंधनाचा वाढता अपव्यय याकडे त्यांनी बैठकीत शासनाचे लक्ष वेधले.
या विषयाची गंभीर दखल घेत जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठकीत सकारात्मक प्रतिसाद देत नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे -पाटील यांना वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आवश्यक त्या तातडीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. संबंधित विभागांमध्ये समन्वय साधून नागरिकांना लवकरात लवकर दिलासा मिळेल, यासाठी प्रभावी कार्यवाही करण्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यानंतर आमदार डॉ. परिणय फुके यांनी पोलीस आयुक्तांना स्वतंत्र सविस्तर निवेदन सादर करून शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी ठोस उपाययोजनांची मागणी केली. निवेदनात शहरातील प्रमुख चौकांचे रस्ते रुंदीकरण, आवश्यक ठिकाणी ग्रेड सेपरेटर उभारणे, सर्व प्रमुख चौकांमध्ये इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम (ITMS) पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणे, वाहतुकीच्या घनतेनुसार सिग्नलचे नियोजन करणे, तसेच अतिक्रमण व अनधिकृत पार्किंगविरोधात नागपूर महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने विशेष मोहीम राबविण्याची मागणी करण्यात आली आहे.
डॉ. फुके यांनी विशेषतः वर्धा रोड (अजनी ते विमानतळ), सेंट्रल अॅव्हेन्यू (ऑटोमोटिव्ह स्क्वेअर ते गांधी पुतळा), अमरावती रोड, हिंगणा रोड, बेसा–मनीष नगर मार्ग, कामठी रोड, ग्रेट नाग रोड, उमरेड रोड, इनर रिंग रोडवरील प्रमुख चौक आणि मिहान–विमानतळ मार्ग या अत्यंत वर्दळीच्या मार्गांवर प्राधान्याने उपाययोजना करण्याची आवश्यकता अधोरेखित केली.
तसेच व्यावसायिक भागांमध्ये पुरेशा पार्किंग सुविधांची निर्मिती, रस्त्यावरील अनधिकृत पार्किंगला आळा घालणे आणि वाढत्या वाहतूक ताणाच्या पार्श्वभूमीवर ट्रॅफिक वॉर्डनची संख्या वाढविण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
नागपूर शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुरक्षित, गतिमान आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी प्रशासनाने तातडीने समन्वयात्मक कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त करत आमदार डॉ. परिणय फुके यांनी या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचे सांगितले.




