Published On : Sat, Apr 17th, 2021

कोव्हिडला गांभीर्याने घ्या; नियम पाळा, सतर्क राहा!

कोव्हिड संवादच्या माध्यमातून डॉक्टरांचे आवाहन

नागपूर : आजची शहरातील व राज्यातील कोरोनाची स्थिती पाहता जेवढी जास्त काळजी घेता येईल तेवढी प्रत्येकाने घेणे आवश्यक आहे. आज आरोग्य यंत्रणेवरचा ताण वाढत आहे मात्र सर्व यंत्रणा अहोरात्र सेवा देत आहेत. अशा परिस्थितीत नागरिक म्हणून आपण सर्व आपली जबाबदारी ओळखणे आवश्यक आहे. आज मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे पण लोकांमध्ये गांभीर्य दिसत नाही. सर्वांनी काळजी घेतली, नियम पाळले तर कोरोनाच्या या संकटाला लवकरच आटोक्यात आणता येईल. त्यामुळे प्रत्येकाने कोव्हिडला गांभीर्याने घ्या, नियमांचे पालन करा व सतर्क रहा, असे आवाहन प्रसिद्ध श्वसनरोग चिकित्सक डॉ. राजेश बल्लाळ व रेडिओलॉजिस्ट तथा प्रिसिजन स्कॅन अँड रिसर्च सेंटरचे संचालक डॉ. निलय निंबाळकर यांनी केले.

Gold Rate
24 Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,23,400 /-
Gold 22 KT ₹ 1,14,800 /-
Silver/Kg ₹ 1,51,600/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नागपूर महानगरपालिका आणि इंडियन मेडिकल असोसिएशन (आय.एम.ए.) यांच्या संयुक्त विद्यमाने महापौर दयाशंकर तिवारी यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या ‘कोव्हिड संवाद’ या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात शुक्रवारी (ता.१६) डॉ. राजेश बल्लाळ आणि डॉ. निलय निंबाळकर यांनी ‘कोव्हिड : एचआरसीटी विषयावर शंका आणि निरसन’ या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी नागरिकांकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे देत त्यांच्या शंकांचे निरसन केले.

कोव्हिड-१९ श्वसनक्रियेचा आजार आहे. त्याचा प्रभाव नाक, कान, घसा, फुफ्फुस, हृदय आदींवर होतो. फुफ्फुसाच्या आजाराची तपासणी करताना ती एक्स रे आणि एचआरसीटी स्कॅन या दोन प्रकारे केली जाते. एक्स रे द्वारे काही ठराविक माहितीच प्राप्त होउ शकते. त्यामुळे त्याच्या पुढची अद्ययावत प्रणाली म्हणून ‘हाय रिसॉल्यूएशन सीटी स्कॅन’ अर्थात एचआरसीटी स्कॅन केले जाते. एचआर सीटी स्कॅन हे फुफ्फुसाचा संपूर्ण आजार दर्शविते. फुफ्फुसाच्या आजाराचे निदान करताना एचआरसीटीमध्ये २५ भागांद्वारे विभाजीत केले जाते. ज्याला आपण एचआरसीटी स्कोर म्हणतो. जसे प्रत्येकच कोरोनाबाधित रुग्णाला हॉस्पिटलची गरज पडत नाही. तशीच प्रत्येक रुग्णाला एचआरसीटी स्कॅन करण्याचीही गरज पडत नाही. ते करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. कोरोना चाचणी केल्यानंतर किंवा काही लक्षणे आढळल्यानंतर ५ ते ६ दिवसांनंतर एचआरसीटी करणे योग्य असते. त्यामुळे रुग्णाला कितपत धोका आहे हे स्पष्टपणे दिसू शकते. अनेक लोक लहान मुलांनाही एचआरसीटी करायला घेउन येतात ही चुकीची बाब आहे. त्यामुळे स्वत:च स्वत:चे डॉक्टर बनून एचआरसीटी करू नका. डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्यांनी सांगितल्यानंतरच एचआरसीटी स्कॅन करा, असा सल्ला डॉ. राजेश बल्लाळ आणि डॉ. निलय निंबाळकर यांनी यावेळी दिला.

कोरोनाचा संसर्ग झाल्यास लक्षणे नसल्यास किंवा सौम्य लक्षणे असल्यास रुग्णाला गृह विलगीकरणात ठेवण्याची परवानगी आहे. यासाठी रुग्णाने वेगळ्या खोलीत राहण्याची गरज असते. कोव्हिडचा संसर्ग वाढू नये आपल्यामुळे इतरांना धोका निर्माण होउ नये यासाठी प्रत्येकाने ‘आयसोलेशन’चे नियम कटाक्षाने पाळावे. कोव्हिडच्या या संकटाच्या काळात शासकीय आणि खाजगी रुग्णालयातील डॉक्टर अविरत त्यांचे कर्तव्य पार पाडत आहेत. आपणही स्वत:च्या सुरक्षेसाठी आपली जबाबदारी ओळखून सुरक्षित राहूया, असा मौलिक संदेशही यावेळी डॉ. राजेश बल्लाळ आणि डॉ. निलय निंबाळकर यांनी दिला.

Advertisement
Advertisement