Published On : Wed, Jun 3rd, 2020

कोणताही शेतकरी कर्जापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या – पालकमंत्री

– आढावा बैठकीत सर्व बँकांना दिल्या सूचना

गडचिरोली : कर्ज मिळण्यास पात्र असूनही बँका शेतकऱ्यांना कर्ज देत नसतील तर त्या बँका कारवाईस पात्र होतील, कोणताही शेतकरी कर्जापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या अशा सूचना सर्व बँकांना पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत. जिल्हयाचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज जिल्हा प्रशासनाबरोबर विविध विषयांवर आधारीत आढावा घेतला. पावसाळा तोंडावर आला असताना आता शेतकऱ्यांना मशागत, रोवणी, इतर पीकांसाठी पैशांची गरज असते. यावेळी बँकांनी अकारण शेतकऱ्यांना हेलपाटे मारायला लावू नयेत. पात्र शेकऱ्यांना तातडीने कर्ज पूरवठा करा अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

खरीप हंगामाच्या पीक कर्जाच्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक पार पडली. पालक मंत्री म्हणाले या जिल्ह्यामध्ये असलेल्या ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी झालेली आहे. पहिल्या आणि दुसऱ्या यादीमधील कर्जमाफी झाल्यानंतर तिसरी यादी प्रतिक्षित आहे आणि त्या प्रतिक्षित यादीतील शेतकऱ्यांना कर्ज माफ होणारच आहे. कारण ते पात्र शेतकरी आहेत. त्या सर्व शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्याचे काम सरकार करणार आहे. शेतकऱ्यांना त्यासंदर्भात अधिकची माहिती घ्यायची असेल तर ती बँकांमधून मिळवावी. कालच मुख्यमंत्री महोदयांच्या कॅबीनेटच्या मिटींगमध्ये रीझर्व बँकेला यासंदर्भात शेतकऱ्याला कर्ज मिळाले पाहिजे ही भूमिका आणि त्यांची परवानगी मागितली आहे. ज्या शेतकऱ्यांच्या कर्जाचे रूपांतर झालेले आहे, त्याही शेतकऱ्यांना कर्ज देण्याच्या सूचना आजच्या बैठकीत सर्व बँकांना देण्यात आल्या. व्यावसायिक तसेच राष्ट्रीय बँकांनी अत्यंत कमी कर्ज वाटप केल्याचे दिसून येत असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. सर्व बँकांनी कर्ज वाटपाचे उद्दीष्ट पुढिल दहा ते बारा दिवसांमध्ये वाढविण्याच्या सूचनाही केलेल्या आहेत. या बैठकीला जिल्हाधिकारी दीपक सिंगला, व इतर बँक अधिकारी उपस्थित होते.

आवश्यक कागदपत्र सादर करा तुम्हाला कर्ज मिळेल : पालकमंत्री
पालकमंत्री म्हणाले कुठल्याही कागदपत्रासाठी शेतकऱ्याची आडवणूक होता कामा नये. फक्त चारच कागद यामध्ये पासपोर्ट साईज फोटो, नमुना आठ, सातबारा आणि आधार कार्ड लागते. या व्यतिरीक्त कोणतेही कागदपत्र मागितल्यास तक्रार आमच्याकडे करावी किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडे करावी. आणि तरीही बँका शेतकऱ्यांना कर्ज देत नसतील तर त्या बँका मात्र कारवाईस पात्र होतील असे पालकमंत्रयांनी बँकांना सूचना केल्या.

पालकमंत्रयांच्या प्रयत्नातून जिल्हयात परिपूर्ण आरटीपीसीआर कोविड-19 लॅब मंजूर


जिल्हयाचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नातून लवकरच जिल्हयात परिपूर्ण आरटीपीसीआर कोविड-19 लॅब सुरू होणार आहे. याबाबत त्यांनी आज कोरोना आढावा बैठकीत माहिती दिली. यामुळे जिल्हयातील कोविड-19 बाधित रूग्णांचे पॉझिटीव्ह अहवालही तपासता येणार आहेत. याव्यतिरीत् या उच्च दर्जाच्या लॅबमध्ये इतरही संसर्गजन्य आजारांबाबत तपासणी केली जाते. गडचिरोलीमधील कोरोना तपासण्या जलद होवून सामाजिक संसर्ग वेळेत टाळता येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या लॅबच्या मंजूरीसाठी आवश्यक निधी लवकरच उपलब्ध केला जाणार आहे. यासाठी पालकमंत्र्यांनी आरोग्य विभागाचे संचालक, अप्पर मुख्य सचिव यांच्याशी वेळोवेळी पाठपुरावा केल्याचे त्यांनी सांगितले.

*जिल्हयातील पावसाळयापूर्वी रस्ते दुरूस्त करण्याच्या सूचना* : राष्ट्रीय महामार्ग तसेच ग्रामीण रस्ते पावसाआधी वेळेत दुरूस्त करा अशा सूचना संबंधित विभागाला त्यांनी दिल्या. गडचिरोली जिल्हयातील नागरिकांना पावसाळयात दळणवळणासाठी अडचणी होवू नयेत म्हणून ताबडतोब कामे पुर्ण करून लोकांना सहकार्य करा अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.