Published On : Mon, Apr 27th, 2020

नागरिकांना दर्जेदार व योग्य भावात अन्न पदार्थ, औषधी उपलब्ध होतील याबाबत दक्षता घ्या -डॉ. राजेंद्र शिंगणे

अन्न व औषध व विक्रेत्यांची बैठक

उत्पादक व वितरकांशी संवाद

नागपूर : अन्न व औषधी व्याससायिकांनी व ‍ वितरकांनी कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर अन्न पदार्थ व औषध उत्पादन, विक्री व वितरण करतांना शासनाने व पोलीस यंत्रणेने दिलेल्या सुचनांचे तंतोतंत पालन करुन नागरिकांना दर्जेदार व योग्य भावात अन्न पदार्थ व औषधी उपलब्ध होतील याची दक्षता घ्यावी, असे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिले.

नागपूर शहरातील अन्न पदार्थ उत्पादक, औषधे उत्पादक, केमिस्ट असोसिएशन व होलसेल औषधे विक्रेता असोसिएशन, चिल्लर किराणा असोसिएशन, बेकरी व नमकीन उत्पादक व वितरक तसेच प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक नुकतीच घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.

सह आयुक्त (अन्न) चं. भा. पवार, सह आयुक्त औषधे पी.एन.शेंडे, सहाय्यक आयुक्त अन्न अ.प्र. देशपांडे, सहाय्यक आयुक्त औषधे पी.एम.बल्लाळ व विविध संघटनांचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

सर्व सामान्य जनतेला जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा होणार नाही याबाबत दक्षता घेण्यात यावी. नागरिक राहत असलेल्या भागातच शक्यतो वस्तूंचा पुरवठा करण्यात यावा. वस्तूंचा व औषधांचा काळाबाजार होता कामा नये. तसेच योग्य किंमतीत अन्न पदार्थ व औषधे मुबलक प्रमाणात उपलब्ध होतील यासाठी सर्व ऊत्पादकांनी व वितरकांनी सहकार्य करावे असे त्यांनी सांगितले.

अन्न पदार्थ व औषधे वितरण करतांना सुरक्षित अंतर पाळले जावे अशा सुचना त्यांनी दिल्या. सर्व नागरिकांना दर्जेदार व योग्य भावात अन्न पदार्थ व औषधी उपलब्ध होतील याबाबत दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले ऊत्पादक व वितरक यांच्या अडचणी सोडविण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी अन्न व्यावसायिकांककडून तक्रारी व समस्या प्राप्त करून घेऊन त्या तातडीने सोडविण्याच्या सुचना अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी अन्न पदार्थ उत्पादक व वितरकांनी आपल्या समस्या व अडचणी मांडल्या. ऊत्पादकांच्या कारखान्यात कोरोना पेशंट आढळल्यास मालकाला जबाबदार धरु नये, काही कच्या मालाचा पुरवठा हा परराज्यातून होतो. वाहतुकीच्या खर्चामध्ये वाढ झाल्यामुळे अडचणींचा सामाना करावा लागतो, त्यामुळे सुध्दा उत्पादनावर परिणाम होत असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नमुद केले.

दाल मिल असोसिएशन व चिल्लर किराणा असोसिएशन यांनी त्यांचे व्यवसायात कोणतीही अडचण नसुन मुबलक साठा उपलब्ध असल्याचे सांगितले. नागपुर जिल्हयात एकुण आयुर्वेदिक उत्पादक किती, अॅलोपॅथिक औषधी निर्मिती किती तसेच त्यांचे उत्पादन योग्यरित्या सुरु आहे किंवा कसे याची विचारणा मंत्र्यांनी केली व त्यांचे प्रश्न समजून घेतले. उत्पादन कार्य हे मुख्यत्वे सॅनिटायझरर्सचे सुरु असून इतर औषधी उत्पादन फार कमी प्रमाणात सुरु असल्याचे उत्पादकांनी निदर्शनास आणून दिले.

कच्च्या मालाचे किंमतीत व इतर संबंधित पॅकिंग इत्यादींचे संदर्भातील अडचणी मंत्र्यांनी समजून घेतल्या, कच्च्या मालाचा तुटवडा व किमतीत वाढ ही बाब आयुक्तांचे निदर्शनास आणून देत त्यावर योग्य उपाययोजना करायाच्या सूचना मंत्र्यांनी सह आयुक्तांना दिल्या.

मास्कची बाजारपेठेतील उपलब्धता व दर याबाबत त्यांनी चौकशी केली. तसेच मास्कचे गुणवत्तेबाबत सतर्क राहण्याचे निर्देश दिले. मास्कची रस्त्यावरील विक्री होत असल्याचे निदर्शनास आणुन दिल्यावर त्यावर योग्य ती कारवाई करणेबाबत व वापरलेले मास्कचे विल्हेवाटीबद्दल आयुक्त महानगरपालिका यांना कळविण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या. प्रायव्हेट डॉक्टर्स व हॉस्पिटल सुरु नसल्यामुळे पेशंट फार कमी येतात व बरेचवेळा सर्दी तापासाठी त्यांचेकडे डॉक्टरांची चिट्ठी नसते. केवळ 25 टक्के डॉक्टर्सचे दवाखाने सुरु आहेत. डॉक्टर्सला देखील केमिस्ट प्रमाणे दवाखाने उघडे ठेवण्याच्या सूचना दयाव्या, अशी विनंती रिटेल असोसिएशनतर्फे करण्यात आली.