Published On : Sun, May 9th, 2021

स्वत: काळजी घ्या, लोकांचे संसर्गापासून रक्षण करा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

Advertisement

पार्किंगच्या जागांवर लसीकरण केंद्र व्हावे

नागपूर: ‘मला काही होत नाही, कोरोना माझे काही करू शकत नाही’ अशा गैरसमजात भाजपा कार्यकर्त्यांनी राहू नये. गाफील राहू नका आणि लोकांचेही कोरोनाच्या संसर्गापासून संरक्षण करा. तसेच जोपर्यंत संपूर्ण शहर आणि जिल्ह्यात सर्व नागरिकांना लसीकरण होत नाही, तोपर्यंत कोरोनापासून संरक्षण मिळणार नाही, असे प्रतिपादन केंद्रीय महामार्ग वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

Gold Rate
27 June 2025
Gold 24 KT 96,400 /-
Gold 22 KT 89,700 /-
Silver/Kg 1,07,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

शनिवारी सायंकाळी भाजपाच्या आभासी बैठकीत ना. गडकरी बोलत होते. या बैठकीला माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, शहर अध्यक्ष आ. प्रवीण दटके, खा. डॉ. विकास महात्मे, प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे, आ. कृष्णा खोपडे, आ. विकास कुंभारे, आ. मोहन मते उपस्थित होते. जगभरात घडणार्‍या घटना पाहता आणि काही काळ थांबून पुन्हा कोरोनाची नवीन लाट येण्याची भीती अजून असताना आपण पूर्व तयारीत असणे गरजेचे आहे. संक्रमण रोखण्यासाठी काटेकोरपणे नियम पाळले गेले पाहिजे. कोविडचे ‘साईड इफेक्ट’ आता सुरु झाले आहेत. त्याचीही काळजी सर्वांनी घेणे आवश्यक आहे, असेही ना. गडकरी म्हणाले.

हॉस्पिटल व कोविड सेंटर सुरु व्हावेत असे कार्यकर्त्यांना वाटते पण ते खूप जोखमीचे काम आहे. त्यामुळे अस्तित्वात असलेल्या हॉस्पिटलमध्येच रुग्णशय्या वाढविणे हेच चांगले आहे. ÷एम्समध्ये 600 ते 700 रुग्णशय्या ऑक्सीजनसह आता व्यवस्था होत आहे. विदर्भात सर्वत्र आवश्यक ती उपकरणे पुरविण्याचा आपला प्रयत्न आहे. ही उपकरणे कशी हाताळावी यासाठी तालुकास्तरावर प्रशिक्षणाची गरज असल्याचेही ना. गडकरी म्हणाले.

सध्या दररोज 270 ते 275 मे.टन ऑक्सीजनची शहराला गरज आहे. अनेक ठिकाणांहून आपण ऑक्सीजन मिळविला आहे. 6-7 रुग्णालयांना तर सीएसआर निधीतून ऑक्सीजनसाठी आपण मदत केली. हवेतून ऑक्सीजन मिळविणार्‍या प्लाण्टच्या क्षेत्रात आपण स्वयंपूर्ण व्हावे. त्यामुळे तिसर्‍यांदा येणार्‍या संकटाचा मुकाबला करण्यासाठी आपल्याला भटकंती करावी लागणार नाही. रक्तपेढ्यांना रक्तदानाच्या माध्यमातून रक्तपुरवठा आणि प्लाझमा पुरवठा केला जावा. अ‍ॅम्ब्युलन्ससाठी सामान्य माणसाचे होत असलेले शोषण लक्षात घेता प्रत्येक प्रभागात अ‍ॅम्ब्युलन्स उपलब्ध व्हावी यादृष्टीने तयारी करावी लागेल. विदर्भात प्रत्येक जिल्ह्यात 10 याप्रमाणे 100 ते 125 अ‍ॅम्ब्युलन्स स्वयंसेवी संस्थांना देण्याचा विचार आपण करीत आहोत, असेही ना. गडकरी म्हणाले.

रेमडेसीवीरचा तुटवडा लक्षात घेता वर्धा येथून या इंजेक्शनची निर्मिती सुरु झाली आहे. औषध व अन्नावाचून ज्या लोकांची स्थिती बिकट आहे, त्यांना मदत करावी. नवीन लसीकरण केंद्र सुरु करण्यासाठी शहरातील मॉलमधील पार्किंगच्या जागा या केंद्रासाठी वापरता येऊ शकतात. यामुळे लोकांना उन्हात उभे राहण्याची गरज पडणार नाही. येत्या महिनाभरात जिल्ह्यातील एकही व्यक्ती लसीकरणाशिवाय राहणार नाही, यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. रुग्णांच्या नातेवाईकांचा कुणीही गैरफायदा घेऊ नये याकडेही लक्ष द्यावे लागेल. तसेच आपण विविध संस्थांना दिलेली उपकरणे वापरली जात आहेत की नाही, याकडेही लक्ष देणे आवश्यक असल्याचे ना. गडकरी म्हणाले.

Advertisement
Advertisement