Published On : Thu, Apr 2nd, 2020

दिल्ली निजामुद्दीन येथे घडले ते पुन्हा घडू नये याची काळजी घ्या. पथ्य पाळले नाही म्हणून त्याची किंमत मोजावी लागते आहे – शरद पवार

Advertisement

शरद पवारांनी तिसर्‍यांदा जनतेशी साधला संवाद.
नव्या पिढीने वाचनसंस्कृती वाढवावी ;व्यक्तीगत ज्ञानसाठा वाढविण्यासाठी प्रयत्न करा…

मुंबई – दिल्लीच्या निजामुद्दीन येथे तब्लिगीने मरकजचे आयोजन केले होते. यामध्ये राज्यातील हजारो लोक सहभागी झाले होते यातून काही लोकांनी कदाचित कोरोना रोगाला बरोबर घेवून प्रवास केल्याचे नाकारता येत नाही. त्यामुळे त्यानंतर हा रोग फैलावतो की काय असे चित्र दिसत आहे. असे काही समारंभ असतात त्यामध्ये अनेक लोकांचा सहभाग असतो परंतु आजची परिस्थिती लक्षात घेता पथ्य पाळली पाहिजेत मात्र तब्लिगीने हे पथ्य पाळले नाही त्यामुळे याची किंमत मोजावी लागत आहे अशी भीती व्यक्त करतानाच पुन्हा असं घडता कामा नये याची काळजी घ्या असे आवाहनही राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज केले.

शरद पवार यांनी आज सोशल मीडियाच्या माध्यमातून तिसऱ्यांदा देशातील जनतेशी संवाद साधला आणि रामनवमीच्या शुभेच्छा देताना कोरोना रोगाच्या विरोधात लढण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले.

दरम्यान दिनांक ८ एप्रिल २०२० रोजी मुस्लिम बांधवांचा कब्रस्तानमध्ये एकत्रित जावून हयात नसलेल्या नातेवाईकांचे स्मरण करण्याचा दिवस आहे. मात्र हे स्मरण घरात बसूनच करा. नमाजही घरातच बसून करा. ही वेळ किंवा प्रसंग एकत्रित बाहेर जाण्याचा नाही. त्यामुळे निजामुद्दीनमध्ये जे घडले ते घडू देवू नका याची खबरदारी घ्या असे सांगतानाच दिनांक १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मरण श्रध्देने करण्याचा दिवस आहे. देशभरातून लोक एकत्र येत असतात आणि हा सोहळा दीड महिना चालतो. यावेळेला हा सोहळा साजरा करायचा हा प्रसंग आहे का? हा सोहळा पुढे न्यायचा विचार शक्य आहे का? हे गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. सामुदायिक एकत्र आलो तर नवीन संकटाला सामोरे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाबासाहेबांचे स्मरण करुया. त्यांच्या योगदानाची आठवण ठेवून या सोहळ्यात बदल करण्याचा जाणकारांनी विचार करावा असे आवाहन शरद पवार यांनी यावेळी केले.

अजून लोक रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. त्यामुळे कोरोना रोगाचे रुग्ण वाढत आहेत. दैनंदिन गरजा असतात. त्यामध्ये भाजीपाला, धान्य याची गरज आहे. परंतु याची कमतरता नाही असे सरकारकडून सांगण्यात आले होते. शिवाय किराणा दुकाने २४ तास उघडी ठेवली आहेत. मात्र त्याच्या वेळा ठरवाव्यात. परंतु धान्य मिळणारच नाही ही भूमिका घेवून गर्दी किंवा साठेबाजी करु नका असे आवाहन शरद पवार यांनी केले.

सरकारने व पोलीस, आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन तंतोतंत करावे. मात्र त्याची अंमलबजावणी काहीजण करत नाहीत. त्यामुळे पोलिसांना कारवाई करावी लागते आणि त्यामुळे पोलिसांसोबत संघर्ष होतो आहे हे योग्य नाही. ते टाळूया. वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, नर्सेस व पोलीस दलाचे लोक धोका पत्करुन अहोरात्र मेहनत करत आहेत त्यांचा सन्मान करा. त्यांना पुर्णपणे सहकार्य करा. पोलिसांसोबत वादविवाद नकोत असे सांगतानाच जे वैद्यकीय क्षेत्रातील लोक ओपीडी किंवा दवाखाने बंद करुन आहेत त्यांनी तसे करु नये लोकांना सुविधा द्या अशा सूचनाही शरद पवार यांनी दिल्या.

तरुणांमध्ये सध्या चिंतेचे वातावरण आहे. दहा दिवस झाले, दोन आठवडे झाले. लॉकडाऊन वाढेल की काय. परंतु मी कालपासून गीत रामायण ऐकतोय. गदीमा आणि सुधीर फडके यांचं संगीत ऐकल्यावर मनापासून समाधान मिळत आहे. नव्या पिढीने वाचन संस्कृती जतन व वाढवण्यासाठी प्रयत्न करायला हवा. मराठीत अनेक पुस्तके वाचनीय आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवनदर्शन, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे परिवर्तन लिखाण, विठ्ठलराव शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील, पंजाबराव देशमुख, यशवंतराव चव्हाण, या महान व्यक्तींचे जीवनदर्शन लिखाण वाचा. वैज्ञानिक दृष्टिकोन मजबूत होईल यावर आधारित लिखाण वाचन करा…आपला व्यक्तीगत ज्ञानसाठा वाढविण्यासाठी प्रयत्न करावा…सतत वाचा…ज्ञानसंपादीत सुसंवाद ठेवा… सुट्टीच्या कालावधीचा आस्वाद घ्या आणि स्वतःचं व्यक्तीमत्व घडवण्याचा प्रयत्न करा असा मोलाचा सल्लाही शरद पवार यांनी दिला.

राज्यसरकारने व स्वयंसेवी संस्थांनी रिलीफ केंद्रे उघडली आहेत. १ एप्रिलपर्यंत राज्यात कोरोनातील लोकांना मदत योजना म्हणून राज्यातील जिल्हा प्रशासनाने कुटुंब इथे नाहीत, रोजंदार, एकटे, प्रवासी यांच्यासाठी ८१७ ठिकाणी केंद्रे उघडली आहेत त्यामध्ये ६४ हजार ९६९ लोकांची भोजन व्यवस्था, याशिवाय लेबर कॅम्प – १ हजार ७२१ ठिकाणी – २ लाख ४९ हजार ३९९ लोकांना सहभागी केले आहे. साखर कारखान्यात २८ कॅम्प असून त्यामध्ये २ हजार ५७५ मजुर आहेत. याशिवाय पाटबंधारे व विविध विकासकामे यावर ५७७ कॅम्प उघडण्यात आले आहेत. त्यामध्ये १५ हजार ३२३ मजूर काम करत आहेत. असे एकूण राज्यात ३ हजार १४३ कॅम्पमध्ये ३ लाख ३२ हजार २६६ लोकांना निवारा, अन्नधान्य व औषध सुविधा देण्यात आली आहे अशी माहितीही शरद पवार यांनी दिली.

याशिवाय महाराष्ट्रातील काही स्वयंसेवी संस्था गावागावात फिरून अन्न धान्य गोळा करून सोय करत आहेत. त्यांचाही हातभार लागत आहे. अशा स्वयंसेवी संस्था, दानशूर घटक यांचे शरद पवार यांनी अभिनंदन केले.

लवकरात लवकर गरजू लोकांच्या अडचणी दूर करुन, स्वच्छता ठेवून, एकत्रित म्हणजे समुदायाने न राहता सूचनांचे तंतोतंत पालन करुन या रोगावर मात करूया असे आवाहन करतानाच काहीही झाले तरी हा रोग व त्याचा पराभव केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही या ऊर्मीने आपण सगळेजण सामोरे जावुया असा विश्वास शरद पवार यांनी जनतेला दिला.

सोशल मिडियाच्या माध्यमातून संवाद साधतानाच सुरुवातीला रामनवमीच्या देशवासियांना शुभेच्छा दिल्या. आजचा दिवस रामनवमीचा आहे. उत्तर हिंदुस्थानात हा दिवस मोठ्या प्रमाणात व उत्साहात साजरा केला जातो. मात्र दुर्दैवाने कोरोनाचे संकट आल्याने पथ्यांचे पालन करावे लागत आहे. या पथ्यांमुळे सोहळे साजरे करता येत नाहीयत. आज घरात बसून लोक श्रीरामाचे स्मरण करत असतील याबद्दल माझ्या मनात शंका नाही. आजची रामनवमी आगळा वेगळा योगायोग आहे. २ एप्रिलला रामनवमी आणि १ एप्रिल १९५५ साली गीतरामायणाची सुरुवात पुणे आकाशवाणी केंद्रात संचालक असलेले सीताकांत लाड यांनी पुढाकार घेऊन रामायणावर गीत प्रसृत करण्याचा संकल्प केला. १ एप्रिल १९५५ रोजी ‘स्वंय श्री रामप्रभू ऐकती’ हे आकाशवाणी पुणे यांनी प्रसृत केले.

गीत रामायणात ५६ गीते होती. ही गीते पुढे अजरामर झाली. याचं श्रेय ग. दी. माडगूळकर यांना द्यावं लागेल. या सगळ्या लोकांची गम्मत वाटते. त्यांचं लिखाण… काव्य… काव्य रचनेतील अचूक निवडलेले शब्द हे सर्व अलौकिक आहे. हे अलौकिक अशा व्यक्तीची पार्श्वभूमी काय तर मिरजहून पंढरपूरला जाताना सोलापूर जिल्हयातील सीमेवर सांगोलाच्या अलिकडे एक टेकडी आहे त्यावर एक पत्र्याचे घर आहे. त्याला बामणाचा पत्रा म्हणून ओळखतात. ते गदीमांचे निवासस्थान. गदीमांचे गाव माडगूळ आहे. औंधा येथे शिक्षण झाले. उच्चविद्या विभूषित नव्हते परंतु उत्तम साहित्यिक म्हणून लौकिक देशात झाला. गीत रामायण अजरामर झाले. गदीमांची शब्दरचना तर सुधीर फडके ऊर्फ बाबूजींचे संगीत आणि प्रभाकर जोग यांचे वाद्यवृंदाने साथ दिली आणि अजरामर झाले. त्यामुळे स्मरण करण्याचा कालचा आजचा दिवस आहे याचं समाधान आहे. कोरोनाने आज जग चिंतेत आहे व या रोगाने जगाला ग्रासले आहे. या रोगाला आवर घालण्याची पावले टाकली जात आहेत परंतु तरीही हा रोग वाढतोय त्याचा प्रादुर्भाव होत आहे हे आजचे चित्र आहे असेही शरद पवार यांनी सांगितले.