Published On : Sat, Mar 14th, 2020

कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून खबरदारी घ्या..! – डॉ. आशिष देशमुख

“कोरोनाचे रुग्ण नागपूरमध्ये आढळल्याने आता जास्त सतर्क राहण्याची गरज आहे. या विषाणूवर कुठलेही औषध नाही. परंतु, प्रतिबंधात्मक उपाययोजनेने या आजाराचे संक्रमण थांबविणे शक्य आहे. 

या विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून नागरिकांनी खबरदारी घ्यावी, घाबरून जाऊ नये. शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, स्विमिंग पूलचा वापर करू नये, हस्तांदोलन करू नये, नाका-तोंडाला हात लावू नये, साबणाने वारंवार हात धुवावेत, शिंकतांना/खोकलतांना तोंडावर रुमाल ठेवावा तसेच सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा”, असे मार्गदर्शन माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी केले.

दि. १३ मार्चला डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, रामबाग कॉलनी, इमामवाडा येथे त्यांच्या पुढाकाराने आयोजित ‘कोरोना संदर्भात जनजागरण व माहिती शिबिराच्या’ उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. दक्षिण-पश्चिम नागपूरमधील प्रत्येक प्रभागात अशा प्रकारची ४ शिबिरे आयोजित करण्यात येतील. ही शिबिरे दर आठवड्याला विविध ठिकाणी घेण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.  
 
या शिबिरात लता मंगेशकर हॉस्पिटल, डिगडोह हिल्स, हिंगणा रोड, नागपूरच्या प्रतिबंधात्मक व सामाजिक औषध (PSM) विभागाच्या विशेषज्ञांनी कोरोनासंबंधी जनजागरण व उपाययोजनांची माहिती दिली. मास्कचा वापर कसा करावा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, वारंवार हात साबणाने धुवावे अशा बाबींवर त्यांनी प्रकाश टाकला. जनतेने घाबरून न जाता प्रतिबंधात्मक उपाय केल्यास कोरोना विषाणूचा संसर्ग होणार नाही, असे मार्गदर्शन त्यांनी केले.
 
यावेळी नागपूर शहर कॉंग्रेस कमेटीचे महासचिव श्री. प्रशांत ढाकणे, नगरसेविका सौ. हर्षलाताई साबळे, समाजसेवक प्रा. राहुल मून, माजी नगरसेवक श्री. मनोज साबळे, डॉ. लता तपनीकर मंचावर उपस्थित होते. दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्रातील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.