Published On : Thu, Jul 8th, 2021

मनपाच्या सर्व वाचनालयांना शासकीय अनुदान मिळावे यासाठी कार्यवाही करा : पालकमंत्री

Advertisement

– वाचनालय व अध्ययन कक्षांचे संचालन व व्यवस्थापनाचा घेतला आढावा

नागपूर : नागपूर शहरामध्ये मनपाचे वाचनालय व अध्ययन कक्ष सुरू आहेत. या वाचनालय व अध्ययन कक्षामध्ये नियमित योग्य सोयी सुविधा राहाव्यात तसेच त्याचे योग्य व्यवस्थापन राहावे यासाठी काळजी घेण्याची गरज आहे. वाचनालय व अध्ययन कक्षामध्ये विद्यार्थ्यांना वेळेवर आवश्यक सोयी उपलब्ध व्हाव्यात यासाठी महाराष्ट्र सरकारद्वारे वाचनालयांना अनुदान दिले जाते. नागपूर महानगरपालिकेच्या सर्व वाचनालय व अध्ययन कक्षांना राज्य शासनाचे शासकीय अनुदान मिळावे यासाठी आवश्यक कार्यवाही सुरू करा, असे निर्देश पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी दिले.

Advertisement

नागपूर महानगरपालिकेचे वाचनालय व अध्ययन कक्षांचे संचालन व व्यवस्थापनाचा पालकमंत्र्यांनी गुरूवारी (ता.८) आढावा घेतला. मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारतीमधील आयुक्त सभागृहामध्ये यासंदर्भात बैठक घेण्यात आली. बैठकीत पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांच्यासह विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., नगरसेवक सर्वश्री किशोर जिचकार, पुरूषोत्तम हजारे, जुल्फेकार भुट्टो, परसराम मानवटकर, नगरसेविका नेहा निकोसे, अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा, मुख्य अभियंता लीना उपाध्ये, अधीक्षक अभियंता अभय पोहेकर, कार्यकारी अभियंता गिरीश वासनिक, सहायक आयुक्त गणेश राठोड, घनश्याम पंधरे, शिक्षणाधिकारी प्रीति मिश्रीकोटकर, ग्रंथालय अधीक्षक अलका गावंडे, मनोज साबळे, महेश श्रीवास आदी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement

नागपूर शहरामध्ये मनपाचे एकूण ३४ वाचनालय व ७७ अध्ययन कक्ष आहेत. यामधील काहींचे संचालन व व्यवस्थापन स्वत: मनपाच्या कर्मचा-यांद्वारे केले जाते तर काहींचे संचालन व व्यवस्थापन बचत गटांकडे देण्यात आले आहे, अशी माहिती यावेळी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिली. वाचनालय व अध्ययन कक्षांचे संचालन व व्यवस्थापन मनपाने स्वत:च करावे. या क्षेत्रातील अनुभव असणा-या संस्थांनाच ती जबाबदारी सोपवावी, असे पालकमंत्री म्हणाले. वाचनालय व अध्ययन कक्षांमध्ये पिण्याचे पाणी व इतर भौतिक सुविधा उपलब्ध असणे आवश्यक आहे. याबाबत मनपा प्रशासनाने विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. वाचलनाय व अध्ययन कक्षांना शासकीय अनुदान प्राप्त होउन त्यातून आवश्यक सोयी उपलब्ध व्हाव्यात यासाठी पालकमंत्र्यांद्वारे बैठक घेण्यात येईल. यानंतर मुंबई येथे संबंधित विभागाच्या अधिका-यांसोबत बैठक घेउन याबाबत निर्णय घेण्यात येईल. यासंदर्भात मनपा प्रशासनाद्वारे आवश्यक कार्यवाही सुरू करण्याचे पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी निर्देश दिले.

उत्तर नागपूरमध्ये डॉ. राममनोहर लोहिया व बाजीराव साखरे ई-ग्रंथालय हे दोन वाचनालये व अध्ययन कक्ष अद्ययावत करण्यात येणार आहे. यासंदर्भात बैठकीत सादरीकरण करण्यात आले. राममनोहर लोहिया वाचनालय व अध्ययन कक्ष अद्ययावत करताना तेथे विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ नागरिक व चिमुकल्यांसाठी विशेष व्यवस्था करणे, मुले व मुलींसाठी स्वतंत्र अध्ययन कक्ष, सेमिनार सभागृह, पार्किंगसाठी जागा या सर्व बाबींकडे लक्ष देण्याचे त्यांनी निर्देशित केले. बाजीराव साखरे वाचनालय व अध्ययन कक्ष सुद्धा अद्ययावत करण्याबाबत आवश्यक सूचना त्यांनी दिल्या. तसेच उत्तर नागपूरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर संदेश ग्रंथालय, पाचपावली सिध्दार्थ अध्ययन कक्ष टेका, पंचशील वाचनालय बद्दल ही दुरुस्ती करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

चिमुकल्यांसाठी ‘किड्स लायब्ररी’
नागपूर शहरामध्ये काही वर्षांपूर्वी चिमुकल्यांसाठी ‘किड्स लायब्ररी’ सुरू होती. यामध्ये लहान मुलांना खेळण्यापासून ते त्यांच्यासाठी रंजक गोष्टी, कथा आदींची पुस्तके होती. ही संकल्पना नागपूर शहरात पुन्हा एकदा रूजवून शहरात चिमुकल्यांसाठी ‘किड्स लायब्ररी’ उभारण्याचा मानस पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी व्यक्त केला. यासंदर्भात बैठकीत सादरीकरणही करण्यात आले. शहरातील जास्तीत जास्त मुलांना त्याचा लाभ व्हावा यादृष्टीने ‘किड्स लायब्ररी’च्या निर्मितीसाठी मनपाने जागेची निवड करण्याचेही त्यांनी निर्देशित केले. या किड्स लायब्ररीमध्ये लहान मुलांना खेळण्यापासून ते अभ्यासापर्यंत सर्वच बाबींची पूर्तता व्हावी. यासोबतच येथे ज्येष्ठ नागरिक व पालकांसाठी वेगळे कक्ष उभारून तिथे वृत्तपत्र व इतर बाबींची व्यवस्था करणे तसेच लहान मुलांना स्तनपान करता यावे, यासाठी मातांकरिता स्तनपानासाठी वेगळे कक्ष उभारण्याचेही निर्देश यावेळी पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी दिले.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
 

Advertisement