Published On : Fri, Jan 31st, 2020

सफाई कर्मचा-यांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन मिळण्याबाबत कार्यवाही करा

आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांचे निर्देश

नागपूर : शहरातील कचरा संकलन आणि व्यवस्थापनाकरीता नियुक्त ए.जी.एन्व्हायरो व बी.व्‍ही.जी. या एजन्सीमध्ये नियुक्त सफाई कर्मचारी व ऐवजदारांच्या वेतनाबाबत अनेक संभ्रम आहेत. कर्मचा-यांच्या कुशल, अर्धकुशल, अकुशल कामगार या वर्गवारीनुसार दोन्ही एजन्सीकडून वेतन दिले जाते. मात्र कर्मचा-यांना त्यांच्या कामाच्या स्वरूपानुसार वेतन दिले जात नसल्याची तक्रार असून मनपाकरीता काम करणा-या सर्व सफाई कर्मचा-यांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन मिळण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी दिले.

Gold Rate
19 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,10,300 /-
Gold 22 KT ₹ 1,02,600 /-
Silver/Kg ₹ 1,29,600/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

आरोग्य विभागाच्या विविध विषयांच्या अनुषंगाने शुक्रवारी (ता.३१) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांच्यासह विशेष आमंत्रित सदस्य प्रफुल्ल गुडधे, समिती सदस्य लहुकुमार बेहते, कमलेश चौधरी, संजय बुर्रेवार, सदस्या लीला हाथीबेड, विशाखा बांते, सरीता कावरे, आशा उईके, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, आरोग्य उपसंचालक डॉ.भावना सोनकुसळे, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ.प्रदीप दासरवार, पशुचिकित्सक अधिकारी डॉ.गजेंद्र महल्ले, हत्तीरोग अधिकारी जयश्री थोटे, सहायक आरोग्य अधिकारी डॉ.विजय जोशी आदी उपस्थित होते.

मनपाद्वारे नियुक्त ए.जी. एन्व्‍हायरो व बी.व्‍ही.जी. या एजन्सीमधील कार्यरत कर्मचा-यांना किमान वेतन कायद्यानुसार वेतनाबाबत बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. मनपाद्वारे यापूर्वी नियुक्त एजन्सी कनक रिसोर्स मॅनेजमेंटकडून दिल्या जाणा-या वेतनापेक्षा नवीन एजन्सीकडून सफाई कर्मचा-यांना जास्त वेतन देण्याचे आधीच निर्धारित करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात सफाई कर्मचा-यांना नवीन एजन्सीकडून त्या तुलनेत वेतन दिले जात नसल्याची तक्रार करीत विशेष आमंत्रित सदस्य प्रफुल्ल गुडधे यांनी नाराजी दर्शविली. यावर आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी दखल घेत मनपाकरीता काम करणा-या सफाई कर्मचा-यांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन मिळावे, याबाबत संबंधित विभागाने चौकशी करून आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

स्वच्छता शुल्काबाबत आयुक्त देणार अभिप्राय
मनपातर्फे घराघरांतून गोळा करण्यात येणा-या कच-यासाठी मनपातर्फे ६० रुपये प्रति महिना स्वच्छता शुल्क आकारले जाते. याबाबत संभ्रम असल्याबाबत नगरसेवक प्रफुल्ल गुडधे यांनी नोटीस पाठविले होते. या विषया संदर्भात मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे संबंधिक विषय वर्ग करून त्यावर त्यांचा अभिप्राय घेण्यात येईल. यानंतर समितीकडून सदर विषय सभागृहामध्ये सादर केला जाणार असल्याचे यासाठी आरोग्य समिती सभापतींनी सांगितले.

१५ फेब्रुवारीपर्यंत सर्व दहनघाटावर सुविधा पुरवा
मनपा हद्दीतील दहन घाटांची देखरेख व नियंत्रणाबाबत यावेळी बैठकीत चर्चा करण्यात आली. शहरामध्ये १६ घाटांवर मनपातर्फे सुविधा पुरविण्यात येते. मात्र शहरातील काही भागांमध्ये ४ दहन घाट असे आहेत जिथे मनपातर्फे सुविधा पुरविली जात नाही. त्यामुळे नागरिकांना अंत्यविधीसाठी मोठे अंतर गाठावे लागते. मनपाच्या अधिकृत १६ दहन घाटांप्रमाणेच इतरही दहन घाटांवर सुविधा पुरविण्यात यावी. दहन घाटांवर लाकडांची व्यवस्था, त्यासाठी शेडची निर्मिती, सुरक्षा रक्षक व अन्य सुविधा येत्या १५ फेब्रुवारीपर्यंत पुरविण्याचे निर्देश यावेळी आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी दिले.

याशिवाय बैठकीमध्ये प्रभाग क्रमांक ९ अंतर्गत गड्डीगोदाम व इतर ठिकाणी जमा होणा-या पावसाळी पाण्याचे निराकरण करण्याबाबत चर्चा, मनपा दवाखान्याचे नुतनीकरण व बळकटीकराबाबत चर्चा, स्वच्छ सर्वेक्षण, आरोग्य विभागात बिट प्रमाणे सफाई कर्मचा-यांचे काम आदी विषयांसंदर्भात चर्चा करण्यात आली.

Advertisement
Advertisement