Published On : Fri, Oct 30th, 2020

एवजदार कर्मचा-यांची ३ दिवसात माहिती न मिळाल्यास आरोग्य अधिका-यांवर कारवाई करा : संदीप जोशी

Advertisement

– महापौर यांचे कर्मचा-यांच्या संघटनेसोबत बैठकीत निर्देश

नागपूर : ज्या ऐवजदारांच्या सेवेची ३० सप्टेंबर २०२०पर्यंत २० वर्ष पूर्ण झालीत अश्या सर्व ऐवजदार सफाई कर्मचाऱ्यांना स्थायी करण्यात येणार आहेत. यासंदर्भात प्रक्रिया सुरू असून या प्रक्रियेला गती देण्यात यावी. दिवाळीपूर्वी पात्र सर्व ऐवजदारांच्या स्थायी नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण करावी, असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी दिले.

ऐवजदार सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसदंर्भात गुरूवारी (ता.२९) डॉ.बाबासाहेब आंबेडकर-पंडीत दीनदयाल उपाध्याय एस.बी.एम.विकास सेवा संस्थेतर्फे महापौरांना निवेदन देण्यात आले. यासंदर्भात मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये घेण्यात आलेल्या बैठकीत महापौर संदीप जोशी यांच्यासह उपमहापौर मनीषा कोठे, स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके, परिवहन समिती सभापती नरेन्द्र (बाल्या) बोरकर, लक्ष्मीनगर झोन सभापती प्रकाश भोयर, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, अतिरिक्त आयुक्त संजय निपाने, उपायुक्त निर्भय जैन, उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन डॉ.प्रदीप दासरवार, सहायक आयुक्त (सामान्य प्रशासन विभाग) महेश धामेचा, कर्मचारी प्रतिनिधी राजेश हाथीबेड, सतिश सिरसवान, नितिन वामन, बबीता डेलीकर, नूतन शेंद्रूणीकर आदी उपस्थित होते.

मनपाच्या सेवेत कार्यरत असतांना अनेक ऐवजदार सफाई कामगार गंभीर आजाराने मृत पावले किंवा कार्यरत असतांना गंभीर आजारामुळे अपात्र ठरविण्यात आले. अशा ऐवजदार सफाई कामगारांच्या वारसांना ऐवजी कार्ड देण्याचा निर्णय सभागृहात झाला. सदर निर्णयानुसार सुमारे १०० वारसांना ऐवजी कार्ड देण्यात आले. परंतू प्रशासनाच्या दिरंगाईमुळे अनेक अर्जदार लाभापासून वंचित असल्याची तक्रार यावेळी ऐवजदार सफाई कर्मचारी प्रतिनिधींकडून करण्यात आली. यासंदर्भात झोनस्तरावर काय कार्यवाही करण्यात आली याबाबत ३ दिवसात माहिती सादर करावी. ३ दिवसात माहिती न मिळाल्यास आरोग्य अधिका-यांवर कारवाई करा,

झोनद्वारे विहीत कालावधीत माहिती सादर न केल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापौर संदीप जोशी यांनी दिला.

आरोग्याच्या समस्येमुळे अनेक ऐवजदार सेवा देऊ शकत नाही मात्र त्यांच्या सेवेचा फायदा त्यांच्या वारसांना व्हावा, यासाठी वारसांना ऐवजी कार्ड देण्याची मागणी यावेळी कर्मचारी प्रतिनिधी राजेश हाथीबेड यांनी केली. ऐवजदार सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध विषयांच्या अनुषंगाने तातडीने आवश्यक कार्यवाही करावी. याशिवाय लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना नियुक्तीची प्रक्रियाही त्वरीत सुरू करावी, असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी यावेळी दिले.