Published On : Fri, Oct 30th, 2020

म्हाडामध्ये पाणी पुरवठया संदर्भात अंतिम तोडगा काढण्याबाबत १५ दिवसात अहवाल सादर करा

Advertisement

– महापौर संदीप जोशी यांचे निर्देश : स्थापत्य समिती करणार निरीक्षण

नागपूर : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा)च्या सदनिकांमध्ये पाणी पुरवठ्या संदर्भात येणाऱ्या तक्रारी दूर करण्यासाठी प्रत्येक सदनिकेमध्ये स्वतंत्र नळ कनेक्शन देण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र यामध्येही अनेक अडथळे येत असल्याने यासंदर्भात अंतिम तोडगा काढण्याबाबत मनपाच्या स्थापत्य व प्रकल्प विशेष समितीद्वारे जलप्रदाय विभाग आणि म्हाडा प्रशासनासह म्हाडाच्या सर्वच कॉलनींचे निरीक्षण करून येत्या १५ दिवसात अहवाल सादर करा, असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी दिले.

म्हाडाच्या कॉलनींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना पाणी पुरवठ्या संदर्भात येणाऱ्या अडचणींच्या संदर्भात महापौर संदीप जोशी यांनी गुरूवारी (ता.२९) विशेष बैठक घेतली. मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये झालेल्या बैठकीत उपमहापौर मनीषा कोठे, स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके, क्रीडा समिती सभापती प्रमोद चिखले, धंतोली झोन समिती सभापती लता काडगाये, सतरंजीपूरा झोन सभापती अभिरूची राजगिरे, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, डॉ.रवींद्र (छोटू) भोयर, नगरसेविका उषा पॅलेट, नगरसेवक संजय चावरे, दिपक चौधरी, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अधीक्षक अभियंता (जलप्रदाय) श्वेता बॅनर्जी, कार्यकारी अभियंता मनोज गणवीर, म्हाडा च्या कार्यकारी अभियंता दिप्ती काळे, ओसीडब्लू चे राजेश कालरा आदी उपस्थित होते.

प्रारंभी महापौर संदीप जोशी यांनी संपूर्ण विषयासंदर्भात प्रशासन आणि लोकप्रतिनीधींमार्फत आढावा घेतला. यावेळी ज्येष्ठ नगरसेवक रवींद्र (छोटू) भोयर यांनी सांगितले की, शहरात रघूजीनगर, रामबाग, तुकडोजी चौक, सामवारी क्वॉर्टर यासह विविध ठिकाणी म्हाडाच्या सदनिका आहेत. मात्र या सदनिकांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना पाण्यासाठी मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

अधीक्षक अभियंता (जलप्रदाय) श्वेता बॅनर्जी म्हणाल्या, नागपूर शहरात विविध भागांमध्ये म्हाडाच्या सदनिका आहेत. या सदनिकांमध्ये मनपाच्या जलप्रदाय विभागाद्वारे नियमित पाणी पुरवठा केला जातो. या इमारतींमध्ये फ्लॅट्सची संख्या जास्त आहे. शिवाय इमारतींच्या परिसरात पाण्याची टाकी (सम्प) नसल्याने प्रत्येकाला पाणी पुरवठा होण्यास अडचण निर्माण होते. ‘सम्प’ तयार केल्यास प्रत्येक कुटुंबाला सुरळीतरित्या पाणी पुरवठा होईल, असेही त्यांनी सांगितले.

सुभाष रोडवरील म्हाडा कॉलनीमध्ये नागरिकांना पाणी पुरवठ्या संदर्भात येत असलेल्या अडथळ्यांबाबतही क्रीडा समिती सभापती प्रमोद चिखले यांनी यावेळी अवगत केले. इमारतींच्या परिसरात ‘सम्प’ तयार करण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. रघूजीनगर येथील म्हाडाच्या एकेका इमारतीमध्ये १६ फ्लॅट्स आहेत. त्यामुळे ‘सम्प’ तयार करताना इमारतीच्या क्षमतेचा विचार करूनच केले जावे. यासंदर्भात येणारी आर्थिक अडचण लक्षात घेता रघूजीनगर येथील इमारतीमध्ये ‘सम्प’ तयार करण्यासाठी मनपा, म्हाडा आणि रहिवासी नागरिकांकडून त्याचा खर्च विभाजीत करण्यात यावा, अशीही सूचना ज्येष्ठ नगरसेवक रवींद्र (छोटू) भोयर यांनी केली. या सूचनेसंदर्भात बोलताना म्हाडाच्या दिप्ती काळे यांनी म्हाडा कडे या प्रकारची तरतूद नसल्याचे स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की तेथील रहिवासियांनी स्वत: सम्प तयार करावे.

एकूणच संपूर्ण विषयाचा सविस्तर अभ्यास होणे गरजेचे आहे. नागरिकांना नियमित सुरळीतरित्या पाणी पुरवठा व्हावा यासाठी नागरिकांच्या सुविधेच्या दृष्टीनेच यासंदर्भात कार्यवाही आवश्यक आहे. अनेक इमारतींमध्ये ‘सम्प’ तयार करण्यासाठी जागा उपलब्ध नाही, अनेक ठिकाणी आर्थिक अडचण येत आहेत संपूर्ण तक्रारीबाबत अनेक समस्या आहेत. या सर्वांचा विचार करून संपूर्ण विषयावर अंतिम तोडगा काढणे आवश्यक आहे. यासाठी स्थापत्य समितीने जलप्रदाय विभाग व म्हाडा प्रशासनासह निरीक्षण करून अहवाल तयार करावा, असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी दिले.