Published On : Mon, Jan 8th, 2018

ताजबाग आणि परिसर सोलरवर घ्या : पालकमंत्री

नागपूर: ताजबाग विकास आराखड्यानुसार संपूर्ण कामे करा. तसेच ताजबाग आणि संपूर्ण परिसर सौर ऊर्जेवर घेऊन येत्या 31 मार्चपर्यंत संपूर्ण शासकीय निधी खर्च करावा, तसेच 15 फेब्रुवारीपर्यंत सर्व दुकानदारांना दुकानांचा ताबा द्या, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नासुप्र आणि ताजबागच्या प्रशासकांना दिले.

यावेळी आ. सुधाकर कोहळे व आ. कृष्णा खोपडे, नासुप्रचे सभापती डॉ. दीपक म्हैसेकर, मनपाचे आयुक्त अश्विन मुद्गल, जि.प. सीईओ कादंबरी बलकवडे उपस्थित होते.

पाणीपुरवठ्याच्या कामाचा आराखडा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण करून देईल व प्रत्यक्षात काम मनपा करवून घेईल. आराखड्यात रस्ता मंजूर आहे. खर्चात कोणतीही वाढ न होऊ देता आवश्यकतेनुसार कामांमध्ये अंतर्गत बदल करता येतील. या वर्षात 41 कोटी खर्च झाले आहेत. 10 कोटी रुपये 31 मार्चपर्यंत खर्च होतील. नुकतेच 2 जानेवारीला शासनाने 9 कोटी पुन्हा मंजूर केले आहे. हा निधीही 31 पर्यंत खर्च करा. या निधीतून होणार्‍या कामांच्या निविदा प्रक्रिया लवकर करून गतीने काम करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी याप्रसंगी दिल्या.

तसेच पुढील वर्षासाठी किती निधीची गरज आहे, याची मागणी शासनाकडे सादर करा. येत्या 15 फेब्रुवारीपर्यंत ताजबाग विकास आराखड्यातील दुकाने हस्तांतरण करा. तसेच ताजबागच्या जागेवरील अतिक्रमण त्वरित हटवा. 4 दर्गे, सरायची कामेही पूर्ण करण्याच्या सूचना करण्यात आल्या. याशिवाय उज्ज्वल गोरक्षण ट्रस्टच्या जागेबाबतचा विषय आणि मनपाला तीन कामे हस्तांतरण करून घेण्याच्या विषयावरही चर्चा झाली.

कोराडी जगदंबा संस्थान
कोराडी जगदंबा संस्थान आणि परिसराच्या विकास कामांचा आढावाही घेण्यात आला. कोराडी विकास कामाच्या लेआऊट प्लानमध्ये कोणत्याही अडचणी नाहीत. एकूण 147 दुकाने असून ही दुकाने लवकरच दुकानदारांना देण्यात येतील. या परिसरात करण्यात येत असलेले रस्ते 15 दिवसात पूर्ण करा. कंपाऊंड वॉलचे कामही लवकरच सुरू करण्याच्या सूचना याप्रसंगी देण्यात आल्या.

राम मंदिर रामनगर
रामनगर येथील राम मंदिर आणि हनुमान मंदिर एकत्र करण्यासाठी असलेली जागेची अडचण लवकरच सोडवली जाईल. हनुमान मंदिरासाठी विकास कामे करण्यासाठी नागरिक समितीने मनपाला विकास कामांची यादी द्यावी. मनपा 2 कोटी रुपयांची विकास कामे करून देईल. तसेच या कामात काय अडचणी असतील तर येत्या 12 तारखेला पालकमंत्री बावनकुळे स्वत: या मंदिर परिसराची पाहणी करणार आहेत.

परमात्मा एक मंडळ
परमात्मा एक सेवक मंडळाला नासुप्रने बांधलेल्या सभागृहाची चाबी लवकर हस्तांतर करण्याची सूचना पालकमंत्री बावनकुळे यांनी यावेळी केली. सभागृह तयार झाले आहे. मंडळाने आवश्यक ते पैसेही भरले आहे. मंडळाला सभागृहाचा पट्टा द्या व आठवडाभरात सभागृहाचा ताबा देण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी नासुप्रला दिले.