Published On : Fri, Jul 23rd, 2021

ताज पब्लिक ट्रस्टकडून मनपाला ४२ जम्बो ऑक्सिजन सिलेंडर भेट

नागपूर: मुंबई येथील ताज पब्लिक सर्व्‍हिस वेलफेअर ट्रस्टच्या वतीने शुक्रवारी (ता.२३) नागपूर महानगरपालिकेला ४२ जम्बो ऑक्सिजन सिलेंडर भेट देण्यात आले. नागपूर शहरातील मनपाच्या रुग्णालयांमध्ये दाखल होणा-या रुग्णांच्या सुविधेच्या दृष्टीने हे जम्बो ऑक्सिजन सिलेंडर मनपाकडे सोपविण्यात आले.

ताज पब्लिक सर्व्‍हिस वेलफेअर ट्रस्टतर्फे पाठविण्यात आलेले ऑक्सिजन सिलेंडर मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांना सुपूर्द करण्यात आले. यावेळी विरोधी पक्षनेता तानाजी वनवे, अतिरिक्त आयुक्त सर्वश्री राम जोशी, संजय निपाणे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, वित्त व लेखा अधिकारी विजय कोल्हे व डॉ. टिकेश बिसेन उपस्थित होते.

कोरोना महामारीच्या दुस-या लाटेत ऑक्सिजन सिलेंडरची फार आवश्यकता भासली होती. मनपाच्या रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठ्यामध्ये आत्मनिर्भर करण्यासाठी पाचपावली आणि के.टी.नगर रुग्णालयामध्ये ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आले आहेत. संभाव्य तिसरी लाट उद्भवल्यास या ऑक्सिजन प्लांटची आणि ताज पब्लिक सर्व्‍हिस वेलफेअर ट्रस्टतर्फे सुपूर्द करण्यात आलेल्या जम्बो ऑक्सिजन सिलेंडरीची मनपाला मोठी मदत होईल, असा विश्वास मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर यांनी व्यक्त केला.