Published On : Wed, Nov 28th, 2018

नाले स्वच्छता, गडर लाईनची समस्या तातडीने सोडवा : महापौर नंदा जिचकार

महापौर आपल्या दारी : मंगळवारी झोनमधील प्रभाग १ आणि ९चा घेतला आढावा

नागपूर : शहरातील वस्त्यांमधून वाहणाऱ्या नाल्यांमुळे वस्तीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे. याशिवाय परिसरातील कचरा वेळेवर उचलण्यात येत नसल्याने नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. परिणामी विविध आजारांच्या विळख्यामध्ये नागरिक जात आहेत. त्यामुळे वेळेवर कचरा उलचणे व नाल्यांची सफाई त्वरित केली जावी यासाठी तातडीने उपाययोजना करा, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी मंगळवारी झोन अंतर्गत प्रभाग १ आणि ९ च्या दौऱ्यामध्ये दिले.

नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ३ डिसेंबर पासून घेणार असलेल्या जनता दरबाराच्या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांच्या समस्या, त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यावर उपाययोजनांसाठी महापौर नंदा जिचकार यांनी ‘महापौर आपल्या दारी’ उपक्रमाची सुरूवात केली. या उपक्रमांतर्गत बुधवारी (ता. २८) मंगळवारी झोनमधील प्रभाग १ व ९ मधील वस्त्यांमध्ये भेट देण्यात आली.

याप्रसंगी स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, जलप्रदाय समिती विजय झलके, मंगळवारी झोन सभापती संगिता गिऱ्हे, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, नगरसेवक महेंद्र धनविजय, किशोर जिचकार, संजय बुर्रेवार, नगरसेविका प्रमिला प्रीतम मंथरानी, सुषमा संजय चौधरी, ममता महेश सहारे, स्नेहा विवेक निकोसे, अपर आयुक्त राम जोशी, सहायक आयुक्त हरिश राऊत, कार्यकारी अभियंता गिरिश वासनिक, कार्यकारी अभियंता (जलप्रदाय) मनोज गणवीर, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, उपअभियंता कल्पना मेश्राम, कमलेश चव्‍हाण, विद्युत अभियंता एन.बी. सालोडकर, आरोग्य झोन अधिकारी महेश बोकारे, ओसीडब्ल्यूचे रत्नाकर पंचभाई यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी, अभियंता व कर्मचारी उपस्थित होते.

महापौर नंदा जिचकार यांनी प्रभाग १ मधील बेझनबाग येथील हर्षवर्धन बुद्ध विहारामधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून दौऱ्याला सुरूवात केली. यावेळी महापौरांनी जरीपटका चौकातील जिंजर मॉलसमोरील भाजी बाजाराला भेट दिली. आपल्या परिसरात नेहमी स्वच्छता राहावी, यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी. तसेच भाजी बाजारामध्ये दुकानांमधून निघणाऱ्या कचऱ्याची वेळेवर योग्य विल्हेवाट लावावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. भाजी बाजारासाठी जागा निश्चित असतानाही रस्त्यावर दुकाने लावून वाहतुकीस अडथळा निर्माण करणारी दुकाने हटवून त्यांना भाजी बाजारात जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देशही महापौर नंदा जिचकार यांनी यावेळी दिले.

यानंतर महापौर व मान्यवरांनी जरीपटका येथील चावला चौकातील नारायण संत गोदडीवाले बाबा हरदास साहिब यांच्या मंदिरामध्ये भेट दिली. यावेळी मंदिराच्या पदाधिकाऱ्यांनी महापौर नंदा जिचकार यांच्यासह सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांचा शाल देऊन सत्कार केला. परिसरातील दहन घाटावर प्रसाधनगृह बांधून तयार असून केवळ पाण्याअभावी ते सुरू नाही. या ठिकाणी त्वरित पाण्यासाठी पाईप लाईन टाकून हे प्रसाधनगृह सुरू करून नागरिकांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी. तसेच परिसरात दररोज स्वच्छता करण्यात यावी, असेही महापौर नंदा जिचकार यांनी यावेळी निर्देशित केले. याशिवाय प्रभागामध्ये सिमेंट रस्ते, पथदिवे, समाज भवन आदींची सुविधा करण्याचीही मागणी यावेळी परिसरातील नागरिकांनी महापौरांना केली.

प्रभाग ९मध्ये इंदोरा-बेझनबाग येथील सुदर्शन कॉलनी येथे नाल्याची भिंत पडल्याने नाल्यालगतच्या घराला धोका निर्माण झाला आहे. यासाठी प्रस्ताव तयार करून त्वरित भिंत बांधण्यात यावी, असेही महापौर नंदा जिचकार यांनी निर्देशित केले. मुकुंदराव आंबेडकर नगर परिसरातून वाहणाऱ्या नाल्याजवळ कचरा जमा करण्यात येतो. तो कचरा अनेक दिवस उचलला जात नाही. या नाल्यालगतच गुरूनानक स्कूल असल्याने शाळेतील मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शिवाय परिसरातील नागरिकांना मोठ्या संख्येत डेंग्यूची लागण झाली आहे. त्यामुळे या परिसरात कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करणे तसेच परिसराचे सौंदर्यीकरण करणे, नाल्यालगतच्या भिंतीला रंगरंगोटी करून येथे सामाजिक संदेश अधोरेखित करून परिसर स्वच्छ व सुंदर करण्यात यावे, असेही निर्देश महापौरांनी यावेळी दिले.

परिसरातून वाहणाऱ्या नाल्यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्याची तक्रार नागरिकांनी केली. नाल्यातील गाळ काढण्यात न आल्याने थोड्या पावसातही पाणी रस्त्यावर येते व घरांमध्ये शिरते. ख्रिश्चन कॉलनी परिसरही या समस्येने बाधीत असून पावसाळ्यात येथील दुर्गा मंदिर पाण्यात बुडत असल्याची तक्रार नागरिकांनी केली. यावर योग्य उपाययोजना करून नाल्यातील व नाल्यालगतची गाळ काढून झाडे-झुडपे व केरकचरा हटवून नाल्याचा प्रवाह सुरळीत करा. असे महापौरांनी निर्देशित केले. यानंतर महापौर नंदा जिचकार व स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी अंगुलीमाल बुद्ध विहार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले व तेथील समस्या जाणून घेतल्या.

परिसरात पाणी पुरवठा वेळेवर होत नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. सध्या परिसरामध्ये बेझनबाग टाकीतून पाणी पुरवठा होत आहे. या परिसरात राजनगर टाकीतून पाणी पुरवठा होणे अपेक्षित आहे. मात्र येथील पाईप लाईनचे काम सुरू असून येथे हार्ड ड्रॉप लागल्याने तो लवकरच दूर करण्यात येईल. त्यामुळे येत्या महिनाभरात परिसरात नियमित सुरळीत पाणी पुरवठा होणार असल्याचे महापौर नंदा जिचकार यांनी यावेळी नागरिकांना सांगतिले. सुदर्शन वाल्मिकी चौकामध्ये सुदर्शन वाल्मिकी समाजभवन निर्माण, रस्त्यावरील खड्डे बुजविणे आदी मागण्या परिसरातील नागरिकांनी यावेळी केल्या.

कामठी रोडवरील पंजाबी लाईनमध्ये पाण्याची समस्या आहे. या परिसरात पाणी पुरवठ्यासाठी रेल्वे पुलाखालून पाईप लाईन टाकणे आहे. मात्र त्यासाठी रेल्वेची परवानगी मिळणे आवश्यक आहे. अशात या परिसरात दोन बोअरवेल तातडीने उभारून येथील नागरिकांना दिलासा देण्यात यावा, असेही महापौर नंदा जिचकार यांनी निर्देशित केले.

पालकमंत्र्यांचा जनता दरबार ३ डिसेंबरला
नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील झोननिहाय, प्रभागनिहाय समस्या ऐकून घेण्यासाठी, महत्त्वाच्या समस्यांवर, प्रश्नांवर तात्काळ निर्णय घेण्यासाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे ३ डिसेंबर ते ११ फेब्रुवारीदरम्यान प्रत्येक सोमवारी झोननिहाय जनता दरबार घेणार आहे. या अंतर्गत ३ डिसेंबरला मंगळवारी झोनमध्ये पालकमंत्र्यांचा जनता दरबार होणार आहे. यावेळी नागरिकांनी सहभागी होऊन आपल्या समस्या मांडण्याचे आवाहन यावेळी महापौर नंदा जिचकार यांनी केले.