नागपूर: दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाच्या सांस्कृतिक महोत्सवानिमित्त सावंगी (मेघे), वर्धा येथे ‘स्वरवैदर्भी’ विदर्भस्तरीय सिनेगीत गायन स्पर्धा दि. ८ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे प्रवेशपत्र रिंग रोडवरील अत्रे लेआउट येथील नगर युवक शिक्षण संस्थेत स्पर्धकांकरिता उपलब्ध आहेत.
स्वरवैदर्भीचे हे पंधरावे वर्ष असून यावर्षी १७ ते ३५ या युवागटासाठी ही गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम २२ हजार, व्दितीय ११ हजार, तृतीय ७ हजार तसेच प्रत्येकी दोन हजार रुपयांचे एकूण ७ प्रोत्साहन पुरस्कार असे एकूण ५४ हजार रुपयांचे रोख पुरस्कार देण्यात येतील. स्पर्धेकरिता प्रवेश शुल्क केवळ १०० रुपये असून प्रवेश शुल्काची संपूर्ण रक्कम सावंगी रुग्णालयाच्या रुग्ण सहाय्यता निधीला देण्यात येईल.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकाने दि. ६ सप्टेंबरपर्यंत प्रवेशपत्र भरावयाचे आहे. प्रवेशपत्रासोबत वयाचा दाखला जोडणे अनिवार्य आहे. निवडफेरी शनिवार, दि. ८ रोजी सकाळी १० वाजता सावंगी मेघे येथील आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाच्या दत्ता मेघे सभागृहात घेण्यात येईल.
या फेरीत स्पर्धकांना सन २००० पूर्वी प्रदर्शित हिंदी चित्रपटातील गीताचे केवळ धृपद व एक कडवे सादर करावयाचे आहे. स्पर्धकांसाठी संवादिनी, तबला व अन्य वाद्यांची व्यवस्था आयोजकांद्वारे करण्यात येणार आहे. या स्वरचाचणी फेरीतून दहा स्पर्धकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात येईल. महाअंतिम स्पर्धा शुक्रवार, दि. २१ सप्टेंबरला सांस्कृतिक महोत्सवात घेण्यात येईल. सर्वच सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार असून विजेत्यांना रोख पुरस्कारासह ‘स्वरवैदर्भी’ सन्मानचिन्हही प्रदान केले जाईल.
प्रवेशपत्रांसाठी स्पर्धक गायकांनी नगर युवक शिक्षण संस्थेतील स्वागत कक्षात चंद्रकांत पावडे यांच्याशी संपर्क साधावा. तसेच, अधिक माहितीसाठी स्वरवैदर्भीचे संयोजक संजय इंगळे तिगावकर (९७६५०४७६७२) किंवा सहसंयोजक सुनील रहाटे (९९२१२८७४०८) यांच्याशी संपर्क साधावा, असे सांस्कृतिक महोत्सवाचे संयोजक डॉ. श्याम भुतडा यांनी कळविले आहे.