Published On : Mon, Apr 24th, 2017

सेवालय प्रकल्प प्रस्तुत ‘Happy Music शो’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे साकोली येथे २८ एप्रिल ला आयोजन

Music Show
परभणी: परभणी येथील होमिओपॅथीक अकादमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज व साकोली येथील स्टेट बँक कर्मचारी तथा मित्र परिवार यांच्या तर्फे परेड ग्राउंड साकोली येथे दि २८ एप्रिल २०१७ रोजी सायंकाळी ७ ते ९ या वेळेत ‘Happy Music शो’ या एचआयव्ही ग्रस्त विद्यार्थ्यांच्या कला व नृत्याविष्काराचे सादरीकरण आयोजीत करण्यात आले आहे.

हा सांस्कृतिक कार्यक्रम सेवालय प्रकल्प हसेगाव जि. लातूर ने प्रस्तुत केला असून यात सेवालायातील ४० एचआयव्ही बाधित विद्यार्थी महाराष्ट्रातील विविध लोकगीत जसे गोंधळ, माउली माउली, गवळण, लावणी, डोंबारी, कोळी गीत, वाघ्या मुरळी यावर त्यांच्या नृत्याविष्कारातून कला सादर करतील. या मुलांमध्ये कला जोपासण्यासाठी सेवालायाचे संस्थापक रवि बापटले व नृत्य दिग्दर्शक स्नेहा शिंदे यांनी परिश्रम घेतले आहेत. या आधी या सांस्कृतिक कार्यक्रमाचे संपूर्ण महाराष्ट्रात ३२ प्रयोग झाले असून त्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद देऊन एचआयव्ही ग्रस्त मुलांच्या पुनर्वसनासाठी यातून आर्थिक मदत देखील केली आहे.

त्याच प्रमाणे या पूर्वी २५ ऑक्टोबर २०१५ रोजी डॉ पवन चांडक यांच्या पुढाकारातून परभणी येथे या कार्यक्रमला उत्स्फ़ुरद प्रतिसाद मिळाला असून यातून सेवालय संस्थेला एच.ए.आर.सी या संस्थेतर्फे लाखाची मदत करून तेथे १ खोली देखील बांधून देण्यात आली आहे.

अशाच प्रकारे साकोली येथे होणाऱ्या कार्यक्रमातून जमा होणारा मदत निधी ‘आम्ही सेवक’ संस्था सेवालय प्रकल्प मु. पो. हसेगाव जि. लातूर मार्फत होणाऱ्या ‘Happy Indian Village’ या १८ वर्ष पूर्ण झालेल्या एचआयव्ही संक्रमित विद्यार्थांच्या पुनर्वसन प्रकल्पसाठी देण्यात येईल.

या कार्यक्रमास कोणतेही पासेस नसून सर्वांना मुक्त प्रवेश देण्यात आला आहे. याचा जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहुन या मुलांना मदत करावी असे आवाहन होमिओपॅथीक अकादमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीजचे अध्यक्ष डॉ पवन चांडक,सत्यनारायण चांडक व आयोजकांनी केले आहे.