Published On : Wed, Aug 30th, 2017

भाजपा महाआघाडीतून स्वाभिमानी शेतकरी संघटना बाहेर पडणार

Advertisement

raju-shetty

कोल्हापूर : राज्यातील सत्तारूढ भाजप महाआघाडीतून स्वाभिमानी शेतकरी संघटना बाहेर पडणार आहे. बुधवारी (दि. ३०) संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक पुण्यातील अल्पबचत भवनात दुपारी दोन वाजता होत आहे. त्यानंतर दुपारी चार वाजता संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी हे पत्रकार परिषद घेऊन सरकारला सोडचिठ्ठी देत असल्याची घोषणा करणार आहेत. अधिकृत सूत्रांनी ही माहिती दिली. तूर्त कोणत्याही पक्षाशी घरोबा न करता शेतकºयांच्या प्रश्नांवर सरकारला घेरण्याची रणनीती संघटनेने आखली आहे.

राज्यातील दोन्ही काँग्रेसचे भ्रष्ट सरकार उलथवून टाकून भाजपचे सरकार सत्तेवर आणण्यात स्वाभिमानी संघटनेचाही वाटा होता. लोकसभेच्या २०१४ च्या निवडणुकीच्या पूर्वी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुढाकाराने भाजपसह शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष आणि खासदार रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्ष अशा पाच पक्षांची महाआघाडी झाली.

Gold Rate
15 May 2025
Gold 24 KT 92,100/-
Gold 22 KT 85,700/-
Silver/Kg 94,800/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

भाजपाचे अभय
पुढे विधानसभेला भाजप व शिवसेनेच्या वाटा वेगळ्या झाल्या तरी ‘स्वाभिमानी’ भाजपसोबत राहिली. त्याची भरपाई म्हणून संघटनेच्या कोट्यातून सदाभाऊ खोत यांना कृषिराज्यमंत्रिपद देण्यात आले. ते सत्तेत गेले आणि संघटनेतील दुही सुरू झाली. खोत संघटनेचे प्रतिनिधी म्हणून सत्तेत गेले; परंतु तिथे गेल्यावर ते सरकारचेच हस्तक बनल्याने शेट्टी व खोत यांच्यातील वाद विकोपाला गेला. त्यातून संघटनेने गेल्या महिन्यांत सदाभाऊंची हकालपट्टी केली; परंतु सत्तारूढ भाजपने मात्र त्यांना अभय देत सत्तेत कायम ठेवले. उलट महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी तर सदाभाऊ हे भाजपच्या कोट्यातून मंत्री झाल्याचे सांगून टाकले. त्यामुळे संघटना सत्तेतून बाहेर पडणार हे स्पष्टच होते. ती बाहेर पडते की पडणार, पडणार म्हणत सत्तेला चिकटून राहते, हीच उत्सुकता होती.

लाचार नाही..
राज्य मंत्रिमंडळाचा पुढील आठवड्यात विस्तार करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामध्ये ‘स्वाभिमानी’ने मागितल्यास मंत्रिपद देऊ, असे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले होते; परंतु ती शक्यता फारच धूसर आहे. त्यामुळे मंत्रिपद मिळाले नाही म्हणून स्वाभिमानी संघटनेतून बाहेर पडली असे चित्र जाऊ नये यासाठी घाईने हा निर्णय घेण्यात आला असून, आम्ही सत्तेसाठी लाचार नसल्याचा संदेश त्यातून देण्याचा ‘स्वाभिमानी’चा
प्रयत्न आहे.

सोडचिठ्ठी देणारा
पहिला पक्ष
भाजपची राज्यात सत्ता यावी यासाठी झटलेली स्वाभिमानी संघटना अवघ्या तीन वर्षांतच सत्तारूढ आघाडीतून बाहेर पडत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घरी बसविण्याची भाषा करण्याची हिंमत अजून काँग्रेसलाही आलेली नाही आणि खासदार शेट्टी मात्र पंतप्रधानांवर तशी थेट टीका करू लागले आहेत. लोकसभेच्या प्रचारात कोल्हापुरातील सभेत मोदी यांनी शेट्टी यांचा उल्लेख ‘माझा परममित्र’ असा केला होता. ही मैत्री अल्पजिवी ठरली आहे.

तूपकर राजीनामा देणार
आता स्वाभिमानी शेतकरी संघटना तशी तांत्रिकच सत्तेत होती. संघटनेचे नेते रविकांत तूपकर हे वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष आहेत; परंतु त्यास निधीच दिलेला नाही. त्यामुळे ते आजच आपला राजीनामा संघटनेकडे सादर करण्याची शक्यता आहे. शेट्टी वगळता संघटनेचे लोकसभा व विधानसभेमध्ये एकही प्रतिनिधित्व नाही. त्यामुळे संख्याबळाच्या पातळीवर सरकारवर त्याचा फारसा परिणाम होणार नाही.

Advertisement
Advertisement
Advertisement