Published On : Tue, Sep 4th, 2018

विदर्भ एक्सप्रेसच्या जनरल कोचचे सस्पेंशन स्प्रिंग तुटले

Advertisement

नागपूर : रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे विदर्भ एक्सप्रेस मोठ्या दुर्घटनेपासून बचावली. गोंदियाहून मुंबईला जात असताना ट्रेन प्लेटफार्मवर लागत होती. यावेळी रेल्वेच्या चाकांची पाहणी करणाऱ्या २ रेल्वे कर्मचाऱ्यांना इंजिनला लागून असलेल्या जनरल कोचचा एक सस्पेंशन स्प्रिंग तुटल्याचे दिसले. ही माहिती मिळताच मेकॅनिकल विभाग लगच कामाला लागला. अवघ्या ३० मिनिटात बोगीचा स्प्रिंग बदलविण्यात आला. त्यानंतर विदर्भ एक्सप्रेस रवाना झाली.

मिळालेल्या माहितीनुसार विदर्भ एक्सप्रेस आपल्या वेळेनुसार ५ वाजून १० मिनिटांनी नागपूर रेल्वेस्थानकावर पोहचली. प्लॅटफॉर्म ३ वर लागण्यापूर्वी ट्रेनचे चाकांची तपासणी करणारे एसएसई धर्मराज कुमार व टेक्निशियन विनोद चिटमिटवार यांची नजर जनरल कोचचा सस्पेंशन स्प्रिंगवर पडली. तांंत्रिक भाषेत याला बोल्स्टर स्प्रिंग म्हणतात. धर्मराज व विनोद यांनी तत्काळ याची माहिती सीनियर डीएमई अभिषेककुमार चौबे यांना दिली.

पुढे कुठलीही दुर्घटना होवू नये म्हणून त्यांनी नागपूर रेल्वेस्थानकावर स्प्रिंग बदलण्याचा निर्णय घेतला. विदर्भ एक्सप्रेस प्लॅटफॉर्मवर थांबल्यानंतर त्या कोच ला ट्रेनपासून वेगळे करुन प्लॅटफॉर्म ४ वर लावण्यात आले. चौबे यांच्या मार्गदर्शनात ५० हुन अधिक कर्मचारी कामावर जुटले. ३० मिनिटात तुटलेला स्प्रिंग काढून दुसरा स्प्रिंग फिट करण्यात आला. ३० मिनिटात स्प्रिंग बदलविल्यानंतर पुन्हा कोचला ट्रेनशी जोडण्याच्या प्रक्रियेला दीड तासांचा वेळ लागला. त्यामुळे विदर्भ एक्सप्रेस नागपूर रेल्वेस्थानकावरून ६ वाजून ५० मिनिटांनी रवाना झाली.

जनरल कोच हा नवीनच होता
रेल्वे धावत असताना जम्पिंग होवून रुळाच्या खाली येवू नये म्हणून बोस्टर स्प्रिंग महत्वाचा असतो. विदर्भ एक्सप्रेसमध्ये ज्या कोचचे स्प्रिंग तुटलेले होते. त्या कोचला बनून वर्षही पूर्ण झाले नव्हते. त्यामुळे बोस्टर स्प्रिंगच्या तुटल्याने गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. हे कोच आधुनिक सुविधेने सज्ज आहे. यात पिण्याच्या पाण्याचा ‘आरओ’, टॉयलेट इंडिकेटर लावले आहे. सोयीसुविधा वाढविण्यासाठी गुणवत्तेवर परिणाम होत आहे. रेल्वेच्या निर्माणीत गुणवत्तेवर होणारा परिणाम भविष्यात त्रासदायक ठरू शकतो.